राहुल गांधींना धक्काबुक्की; मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचा संताप, निदर्शने
राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले आहेत. या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ काँग्रेसने मुंबईसह राज्यात जोरदार निदर्शने केली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत ठिकठिकाणी टायर जाळून जाळत यूपी सरकारचा निषेध नोंदवला आहे. (congress protest against up government)
राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाल्याचं कळताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याखाली निदर्शने केली. यावेळी केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसीम खान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार झिशान सिद्दीकी आदीं सहभागी झाले होते.
यावेळी बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. हाथरस येथील घटनेला योगी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे हे सरकार बरखास्त केलं पाहिजे, असं सांगतानाच अत्याचार पीडित मुलीचा अंत्यविधी झाला नाही, तर उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीला जाळले आहे, असा संताप बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर, उत्तर प्रदेशात जंगल राज सुरू असून हे गेल्या काही दिवसांपासूनच्या घटनांवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे योगी सरकार विनाविलंब बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. राहुल गांधी यांनी कोणत्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नसताना त्यांना धक्काबुक्की होणं ही अत्यंत दुर्देवी घटना असल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.
योगींचा फोटो जाळला
परभणीतही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी योगींविरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. यवतमाळ आणि हिंगोलीतही योगींचा पुतळा जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. यवतमाळ शहरातील बस स्थानक चौकात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर जमले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेधाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे बस स्थानक चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
विंचूर-प्रकाश राज्य मार्गावरील लासलगाव येथील कोटमगाव चौफुलीवर नाशिक जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्तारोको आंदोलन केलं. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. गाधी कुटुंबाला असाच त्रास सुरू राहिल्यास काँग्रेस पक्षही जशास तसे उत्तर देईल, असा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे. पंढरपूरमध्येही सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. वाशिम जिल्हा काँग्रेसकडूनही येथील पाटणी चौकात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (congress protest against up government)
राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचा निषेध, मुंबईत काँग्रेसचे आंदोलन, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्याजवळ योगी सरकारचा निषेध #RahulGandhi pic.twitter.com/nXJZmU2pim
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 1, 2020
यूपीत लोकशाहीचा खून
उत्तर प्रदेशच्या घटनेवर राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व कॉग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेशात गुंडाराज सुरू असून येथे लोकशाहीचा खून झाला आहे. यूपीत महिलांवरील अत्याचारांची मालिका थांबताना दिसत नाही. त्या ठिकाणी महिलांना जिवंतपणी जाळले जात असून हा प्रकार मानवतेला काळीमा फासणारा आहे, अशी टीका ठाकूर यांनी केली आहे. तर, न्यायाची मागणी करणाऱ्या राहुल गांधींना योगी सरकारने धक्काबुक्की केली नसून लोकशाही आणि संविधानाला धक्का दिला आहे. या घटनेचा आम्ही धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया आरपीआय (खरात गट) सचिन खरात यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या:
यूपी पुन्हा गँगरेपने हादरली, बलात्कार पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू
उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की, कॉलर पकडून ताब्यात घेतलं
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; मायावतींची मागणी
(congress protest against up government)