सांगली आणि भिवंंडीवर काँग्रेसचा दावा, आघाडी धर्माचं पालन न केल्याचं नाना पटोले यांचं वक्तव्य
भिवंडी आण सांगली या दोन्ही जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. पण या दोन्ही जागांवर उमेदवार जाहीर केल्याने नाना पटोले यांनी आघाडी धर्माचं पालन न केल्याचं वक्तव्य केले आहे. सांगलीतील जागेवरुन विश्वजीत कदम दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आता दिल्लीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागलं आहे.
Loksabha Election : सांगलीनंतर भिवंडीवरुन महाविकास आघाडीत सुरु झालेल्या वाद सुरु आहे. ठाकरे आणि पवारांनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही, असं नाना पटोले म्हणाले आहेत. तर सांगलीत राऊतांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी बैठका सुरु केल्या आहेत. मात्र काँग्रेसनं याला पाठ दाखवली आहे. सांगलीचा ठाकरेंच्या शिवसेनेसोबतचा वाद असतानाच, आता भिवंडीत शरद पवारांनीही उमेदवार दिल्यानं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उघड नाराजी व्यक्त केलीये. त्याचेच साईड इफेक्ट सांगलीत स्पष्टपणे दिसले आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटलांसाठी संजय राऊत सांगलीत आलेत. मात्र, काँग्रेसच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवली.
काँग्रेस नेते गैरहजर
राऊतांनी बैठका घेतल्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हजर राहिले पण काँग्रेसच्या एकाही नेत्यानं किंवा पदाधिकाऱ्यांनं हजेरी लावली नाही. म्हणजेच तूर्तास तरी सांगलीत, ठाकरे गटाला साथ नाही हेच धोरण काँग्रेसनं ठरवलं आहे. 2 दिवसांआधीही सांगली जिल्ह्यातले काँग्रेसचे स्थानिक नेते आणि आमदार विश्वजित कदमांनी पत्र लिहून सांगलीचा तिढा सुटत नाही तोपर्यंत पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे आणि आता विश्वजित कदम दिल्लीत आले असून ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि केसी वेणुगोपाल यांची भेट घेणार आहेत.
तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आघाडीच्या धर्माचं पालन झालेलं नाही, असं थेटपणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. कारण सांगली आणि भिवंडी या दोन्ही जागांवर काँग्रेसचाच दावा होता. सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील इच्छुक आहेत. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केलीये.
सांगलीवर काँग्रेसचा दावा
2019मध्ये आघाडीत ही जागा आघाडीत राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटली होती. स्वाभिमानीकडून चंद्रहार पाटील लढले होते. आणि विशाल पाटलांनी 3 लाख 44 हजार मतं घेतली होती. तर 5 लाख 8 हजार मतं घेत भाजपचे संजय काका पाटील विजयी झाले.
भिवंडीबद्दल बोलायचं झालं तर, काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे इच्छुक आहेत. मात्र शरद पवारांनी बाळ्या मामा म्हात्रेंना तिकीट जाहीर केलं. 2019 मध्ये, भिवंडीत काँग्रेसचं लढली होती. सुरेश तावरेंनी 3 लाख 67 हजार मतं घेतली होती. तर भाजपच्या कपिल पाटलांनी 5 लाख 23 हजार मतं घेत विजय मिळवला होता.
अशोक चव्हाण यांच्यावर फोडलं खापर
काँग्रेसच्या नेत्यांकडून जागा वाटपावरुन अशोक चव्हाणांवर खापर फोडलं जातं असल्याची माहिती सूत्रांची आहे . भाजपात जाण्याआधी अशोक चव्हाण काँग्रेसकडून जागा वाटपाच्या बैठकीला जात होते. सूत्रांच्या माहितीनुसार मविआतील जागावाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार असल्याचा दावा खासगीत बोलताना काँग्रेसचे नेते करत आहेत. अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या पारंपरिक जागांवर दावा केला नाही,असं काही काँग्रेस नेत्यांचं मत आहे.
काँग्रेसच्याच नेत्यांना जागा वाटपात रस नव्हता. काँग्रेसचे नेते फक्त गप्पा मारायला आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवायला जात होते अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.
स्वत: उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ओढवण्याची तयारी ठाकरे गटाची नाही. आता सांगलीवरुन काँग्रेस हायकमांडच्या कोर्टात बॉल आहे.