वर्ध्यात कोरोनाचा शिरकाव, 35 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह
राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Corona enter in Wardha). कोरोनाने आता थेट वर्धा जिल्ह्यातही शिरकाव केला आहे.
वर्धा : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे (Corona enter in Wardha). कोरोनाने आता थेट वर्धा जिल्ह्यातही शिरकाव केला आहे. वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या परिसरातील एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर आज (10 मे) या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला (Corona enter in Wardha).
या मृत्यू झालेल्या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे वर्ध्यात एकच खळबळ उडाली. गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून वर्धा जिल्ह्याला ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी प्रशासनाने शर्थीने प्रयत्न केले. मात्र, तरीही अखेर कोरोनाने वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान, वर्ध्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली.
वर्ध्याच्या ग्रामीण भागात रुग्ण आढळल्याने प्रशासनात चिंतेचे वातावरण आहे. पॉजिटिव्ह रुग्ण आढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने बैठक घेत कंटेनमेंट झोन निर्माण करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एवढंच नव्हे तर मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती घेतली जात असून त्यांचीदेखील तपासणी केली जाणार आहे.
पुढील दोन दिवसांसाठी वर्ध्यात कडकडीत संचारबंदी
वर्ध्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कठीण पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. वर्धा जिल्हा पुढील दोन दिवसांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्व कामे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 11 आणि 12 मे रोजी जिल्ह्यात मेडीकल दुकानं आणि रुग्णालयं वगळता सर्व दुकानं बंद राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी विवेक भीमनावर यांनी दिली आहे.
दरम्यान, वर्ध्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सुरुवातीपासून काटेकोर नियोजन केले जात आहे. सेवाग्राम, सावंगी आणि वर्धा शहरातील विदर्भातील नामवंत रुग्णालये कोरोनाच्या काळात वर्धेकरांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास आयसोलेशनसाठी लगेच राखीव करण्यात आले. रुग्णलयाच्या 200 खाटा आणि व्हेंटिलेटरचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात आला आहे.
वर्ध्यात काय काय तयारी?
- जिल्ह्यात दोन मोठे रुग्णालय सावंगी, सेवाग्राम तर जिल्हा सामान्य रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय असे मिळून 200 आयसोलेशन बेडची व्यवस्था
- सेवाग्राम वैदकीय रुग्णालयात कोविडच्या पॉझेटीव्ह रुग्णासाठी स्पेशल 100 बेडची व्यवस्था
- वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था
- जिल्ह्यात 87 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे
- वैद्यकीय अधिकारी यांचा विचार केला तर 50 डॉक्टर आहेत तर 110 नर्स सध्या आहेत. इतर डॉक्टर आणि नर्स यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू आहे
- मास्क, सॅनिटायझर्स, PPE किट सध्या उपलब्ध आहे