Corona Update : एक डिसेंबरपासून ते आतापर्यंत विदेशातून महाराष्ट्रात आलेल्या आठ जणांना कोरोना
राज्यात ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार विदेशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत आठ प्रवाशी हे कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण अखेर महाराष्ट्रात आढळून आला आहे. राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक डिसेंबरपासूनच अतिजोखमीच्या देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. तर ज्या देशात फारशी जोखमी नाही, अशा देशातून आलेल्या प्रवाशांची रँडम पद्धतीने कोरोना चाचणी सुरू आहे. आतापर्यंत ज्या देशात ओमिक्रॉनचा फारसा धोका नाही, अशा देशातून आलेल्या 18 हजार प्रवाशांपैकी 400 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान एक डिसेंबरपासून ते आतापर्यंत राज्यात आठ प्रवाशी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
नवी नियमावली जाहीर
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नव्य नियमावलीनुसार ज्या देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत, अशा देशातून राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे. प्रवास करण्यापूर्वी संबंधित प्रवाशाने गेल्या 15 दिवसांमध्ये कुठेकुठे प्रवास केला त्याचा तपशील सादर करणे आवश्यक आहे. तसेच राज्यात येण्यापूर्वी 72 तासांच्या आतील कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्र त्याच्याजवळ असणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोरोना लसीचे दोनही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे.
‘त्या’ तरुणाच्या संपर्कातील सर्वजण निगेटिव्ह
राज्यात कल्याण-डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या तरुणाला ओमिक्रॉन असल्याचं कळाल्यापासून भीतीचं वातावरण आहे. मात्र अशावेळी एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ओमिक्रॉन झालेल्या तरुणाच्या संपर्कातील कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं नाही. संपर्कात आलेल्या सर्वांच्या कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जास्त घाबरून जाण्याचं काही कारण नाही, मात्र राज्य शासनाने सांगितलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणे, आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
संबंधित बातम्या
Ashish Shelar: राज्यात गब्बरचे राज्य आहे काय?, नायरमधील प्रकरणावरून शेलारांचा संतप्त सवाल