कोरोनाबाधित एका रुग्णाने हजारोंची चिंता वाढवली, बीडमध्ये 12 गावं कडकडीत बंद!
जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बीड शहरासह 12 गावांत 24 तास कडकडीत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जारी केले आहे. (Corona patient shopping at Beed)
बीड : पाटोदा तालुक्यातील कारेगाव इथल्या एका कोरोनाबाधित रुग्णाने बीड शहरात उघडपणे फिरत शॉपिंग केली. यादरम्यान काही खासगी रुग्णालये आणि व्यक्तींच्या संपर्कात आल्याने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले आहे. या रुग्णाच्या संपर्कात 369 नागरिक आल्यामुळे खबरदारी म्हणून आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बीड शहरासह 12 गावांत 24 तास कडकडीत संचारबंदी लागू केल्याचे आदेश जारी केले आहे. (Corona patient shopping at Beed)
बीड जिल्ह्यात एकूण 56 रुग्ण बाधीत झाले होते. यापैकी एका 65 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झालाय तर 6 रुग्ण पुणे येथे पुढील उपचारासाठी स्थलांतरित झाले आहेत. याच दरम्यान आतापर्यंत 3 रुग्ण कोरोनामुक्त करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. तर 46 रुग्णांवर जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाटोदा तालुक्यातील कारेगाव इथला रुग्ण बीड शहरातील दोन खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेला होता. शिवाय बाजारात खरेदीसाठी देखील फिरल्याचे समोर आल्याने जिल्हा प्रशासन हादरले आहे. ज्या खासगी रुग्णालयात तपासणीसाठी सदर रुग्ण गेला होता ते दोन रुग्णालय सील करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रार्दुभाव वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी बीड शहरासह 12 गावात 24 तास कडक संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. (Corona patient shopping at Beed)
एकटया रुग्णाने वाढविली चिंता कारेगाव येथील रुग्णाल जेव्हा त्रास होत होता तेव्हा तो शासकीय रुग्णालयात न जाता खासगी रुग्णालयाचा रस्ता धरला. आणि हेच बीडच्या नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. रुग्णाने मार्केट परिसरात फिरून काही वस्तूंची खरेदी केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. एका रुग्णामुळे हजारो नागरिक धोक्यात येऊ नये म्हणून बीड शहरात आणि बीड तालुक्यातील खंडाळा, चऱ्हाटा, पालवण आणि इट, तर पाटोदा तालुक्यातील वैजाळा आणि डोंगरकिन्ही, वडवणी तालुक्यातील देवडी, गेवराई तालुक्यातील खांडवी, मादळमोही आणि धारवंटा, केज तालुक्यातील खरमाटा आणि धारुर तालूक्यातील पारगांव या गांवामध्ये 08 दिवसांसाठी संपूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना कसलाही त्रास वाटत असल्यास त्यांनी घाबरुन न जाता शासकीय रुग्णालयात येऊन तपासणी करवून घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी केले आहे.
(Corona patient shopping at Beed)