Corona update : देशात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. कारण देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. कोरोनाच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटचे प्रकरणे वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचे ६२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. 24 डिसेंबरपर्यंत देशात कोरोनाच्या JN.1 प्रकाराची एकूण 63 प्रकरणे समोर आली आहेत. सर्वाधिक 34 प्रकरणे गोव्यात, 9 महाराष्ट्रात, 8 कर्नाटक, 6 केरळ, 4 तामिळनाडू आणि 2 तेलंगणात आढळून आली आहेत.
केरळमध्ये 128 नवीन कोरोना प्रकरणे गेल्या 24 तासात आढळले असून एका मृत्यूची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, केरळमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 3,128 वर पोहोचली आहे. महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात 50 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, त्यापैकी JN.1 प्रकारातील नऊ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यामुळे राज्यातील नवीन प्रकाराची एकूण प्रकरणे 10 झाली. या 10 प्रकरणांपैकी पाच ठाण्यात, दोन पुण्यात आणि प्रत्येकी एक सिंधुदुर्ग, अकोला आणि पुणे ग्रामीण जिल्ह्यांतील आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, भारतातील वैज्ञानिक नवीन कोविड व्हेरिएंटची बारकाईने तपासणी करत आहे. राज्यांनी चाचणी वाढवणे आणि त्यांची पाळत ठेवणारी यंत्रणा मजबूत करणे आवश्यक आहे. प्रकरणांची संख्या वाढत असले तरी सध्या चिंतेचे कारण नाही. एकूण रुग्णांपैकी 92 टक्के लोक घरी बरे होत आहेत.
कोरोनाची पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाहीये, मात्र काळजी घेण्याची गरज आहे. या सगळ्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष देऊन आहोत. मुख्यमंत्र्यांनीही बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मात्र आपण अपेक्षा करू की त्याचा फार प्रादुर्भाव वाढणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.