पुणेः देशभरातील पालकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. आता 12-14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोविड लसीकरण (Corona Vaccination) चक्क पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार आहे, अशी माहिती डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली आहे. डॉ. अरोरा हे लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या कोविड -19 कार्यगटाचे अध्यक्ष आहेत. आता त्यांनीच हिरवा कंदील दाखवल्यामुळे हे लसीकरण सुरू होण्याचा मोठा मार्ग रिकामा झाला आहे.
सध्या यांचे लसीकरण
केंद्र सरकारच्या निर्णयाप्रमाणे सध्या संपूर्ण देशभरात 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले आहे. देशभरात सुरुवातीच्या 6 दिवसात 1.5 कोटी पेक्षा अधिक मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र, त्यापेक्षा लहान मुलांचे लसीकरण कधी सुरू होणार याची उत्सुकता होती. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही केंद्र सरकारला बारा वर्षांच्या पुढील मुलांचे लसीकरण सुरू करा, अशी मागणी केली होती. सध्या केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे ज्यांचे वय 17 वर्ष पूर्ण झाले आहे, पण 18 संपलेले नाही त्यांना लस देण्यात येत आहे. म्हणजेच 1 जानेवारी 2005 ते 31 डिसेंबर 20017 मध्ये जन्म झालेल्या मुलांचे लसीकरण सुरूय.
जानेवारीत 7.4 कोटी जणांना डोस
डॉ. अरोरा म्हणाले की, आम्ही 15-17 वयोगटातील सर्व 7.4 कोटी किशोरवयीन मुलांना जानेवारीच्या अखेरीस पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आम्ही त्यांना फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून दुसऱ्या डोससह लसीकरण सुरू करू शकू आणि फेब्रुवारीच्या अखेरीस दुसरा डोस पूर्ण करू शकू. त्यानंतर 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीपासून लसीकरण सुरू होऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
ही मुलेही प्रौढांसारखीच…
डॉ अरोरा पुढे म्हणाले की, 12 ते 17 वयोगटातील किशोरवयीन मुलेंही प्रौढांसारखीच असतात, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे हा निर्णयत त्यातही प्रामुख्याने 15-17 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे संरक्षण करण्यासाठी हे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या वयोगटातील सर्व मुलांचे लसीकरण झाल्यानंतर, सरकार पुढील वयोगटाचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णय घेईल. त्यात 12 ते 14 वयोगटातील किशोरवयीन मुलांचा समावेश असू शकतो.
आतापर्यंतची लसीकरण स्थिती
– 15-17 वयोगटातील 45% किशोरवयीन मुलांना कोवॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे.
– जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत 7.4 कोटी मुलांना कोरोना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात येणार.
– 15 ते 17 वर्षांच्या वयोगटातील लसीकरण फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता.
– फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या सुरुवातीला 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होण्याची आशा.
– 2 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांना केवळ संकटकालीन स्थिती पाहून कोवॅक्सिनच्या वापराला केंद्राने मंजुरी दिली आहे.
– काही तज्ज्ञांनी 5 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण अगोदर करण्याची गरज व्यक्त केली आहे.
इतर बातम्याः
Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?
Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?