घरातच मृत्यू होण्याचं लोण आता महाराष्ट्रात, कोरोना पॉझिटिव्ह आई-मुलीचा घरातच मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडले
काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत. | Coronavirus in Maharashtra
वर्धा: समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी घरातच आई- मुलीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. शासकीय रुग्णालयात दोघांची कोरोना चाचणी (Coronavirus Test) करण्यात आली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. (Mother and Girl died in home due to coronavirus in Wardha)
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. कोविड बाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या मायलेकींचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.
मुलगी अनेक दिवसांपासून आजारी
मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले.
जिल्हयात सध्या कोरोनाबधितांचा आणि मृतकांचा आकडा वाढत आहे. अशातच अनेक रुग्ण तपासणी न करता घरीच राहत आहे. आरोग्य विभागाचे सध्या दुर्लक्ष असल्याने अनेकांचा घरीच मृत्यू होत आहे.
राज्यात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांची संख्या 25 टक्क्यांनी वाढली
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे कोरोनाबळींच्या संख्येत कमालीचा उद्रेक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात सिंधुदुर्ग, परभणी, नंदुरबार, अहमदनगर येथे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या एकट्या एप्रिल महिन्यात कोरोना मृतांच्या संख्येत 25 टक्के वाढ पाहायला मिळत आहे. तर नव्याने निदान बाधित होणाऱ्यांची संख्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात 2 लाख 80 हजार इतकी झाली आहे.
संबंधित बातम्या:
‘टास्क फोर्स’च्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, देशव्यापी लॉकडाऊनचे संकेत
अदर पुनावालांना शिवसेनेच्या गुंडांनी धमकी दिली; ‘त्या’ वक्तव्यावर सुभाष देसाईंचा आक्षेप
(Mother and Girl died in home due to coronavirus in Wardha)