कोरोना नियमांची ऐसी तैसी, ठाण्यात रात्री उशिरापर्यंत छमछम, लेडीजबारसह पाच बार सील; महापालिकेची कारवाई
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलेले असताना ठाण्यात मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. (coronavirus: tmc seal five ladies bar in thane)
ठाणे: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाचे नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलेले असताना ठाण्यात मात्र धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाण्यात रात्री उशिरापर्यंत बार सुरू होते. पालिकेने दोन लेडीज बारसह पाच बारवर कारवाई करत हे पाचही बार सील केले. तसेच या बार मालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले आहेत. (coronavirus: tmc seal five ladies bar in thane)
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांना सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली. या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्ग दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.
गुन्हे दाखल
त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बारही सील करण्यात आले. हे पाचही बार रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या तिन्ही बारमध्ये कुणी मास्क लावलेले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यामुळे या पाचही बारवर रात्री उशिरा कारवाई करण्यात आली असून पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
काय होते आयुक्तांचे आदेश
सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन आणि मास्क वापरण्याच्या नियमांचा भंग केल्यास दुकाने आणि आस्थापना सील करा, असे आदेशच विपिन शर्मा यांनी दिले आहेत. त्यांनी ठाण्यातील परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना या आदेशांची सक्तीने अमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. प्रभाग समितीमधील आरोग्य केंद्रांसाठी औषधांचा आवश्यक तो साठा करणे, कोविड १९ चाचणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा गतीमान करणे, टीएमटीच्या बसेसचा फिरते अँटीजन चाचणी केंद्र म्हणून वापर करणे, ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या ठिकाणचे निर्जंतुकीकरण करणे, तेथील सर्वेक्षण करणे, तापाची तपासणी करणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दीड लाखांची वसूली
दरम्यान, ठाण्यात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसांपूर्वी तब्बल 1 लाख 52 हजार, 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर कडक करवाई करण्यात येणार असून दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय पथक तयार करण्यात आले असून दररोज मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी 2021 या दोन दिवसात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 13,000, कळवा,16,500, उथळसर प्रभाग समिती 12,000, माजिवडा प्रभाग समिती 18,500, वर्तकनगर प्रभाग समिती 11,500, लोकमान्य सावरकर प्रभाग समिती 14,000, नौपाडा कोपरी 43,500, वागळे प्रभाग समिती 12,000, तर दिवा प्रभाग समिती 11,500 असा एकूण 1 लाख, 52 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. (coronavirus: tmc seal five ladies bar in thane)
तुम्हाला पुजा शर्माचा व्हिडीओ कॉल तर नाही येत? सावधान, मुंबईत सेक्सटॉर्शनचा पर्दाफाश!https://t.co/9eKM1Ie1de#Sextortion #MumbaiPolice #Facebook #PoojaSharma @MumbaiPolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 22, 2021
संबंधित बातम्या:
ठाण्यात आता कोरोनाचे नियम न पाळल्यास थेट दुकाने, आस्थापना सील; पालिका आयुक्तांचे फर्मान
आमच्याकडून कामात कॉम्प्रमाईज नाही, पण तुम्ही नियम पाळा : अजित पवार
हॉटेलमध्ये 21 कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं महापालिकेला जाग; अँटिजेन टेस्ट आणि RTPCR तपासणीला वेग
(coronavirus: tmc seal five ladies bar in thane)