हा एबी फॉर्म घ्या… अन् कुणी लढवायचं तुम्हीच ठरवा; उद्धव ठाकरेंनी कुणाला सांगितलं असं?
मिळालेल्या माहितीनुसार, घोसाळकर कुटुंबीयांना आज कोरा एबी फॉर्म देण्यात आला आहे. फॉर्मवर कोणाचेही नाव नाही.
विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे, निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. काही जागा वगळता महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटप देखील जवळपास निश्चित झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आतापर्यंत उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, महाविकास आघाडीमध्ये दहिसर विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. मात्र या जागेवर घोसाळकर कुटुंबातून विनोद घोसाळकर आणि तेजस्विनी घोसाळकर असे दोन सदस्य निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.
यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे यांनी सही करून ब्लँक एबी फॉर्म घोसाळकर कुटुंबीयांना दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घोसाळकर कुटुंबीयांना आज कोरा एबी फॉर्म देण्यात आला आहे. फॉर्मवर कोणाचेही नाव नाही. निवडणूक कोणी लढवायची याचा निर्णय तुम्हीच घ्या असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निवडणूक कोण लढणार याबाबत घोसाळकर कुटुंब निर्णय घेणार आहे. तेजस्विनी घोसाळकर आणि विनोद घोसाळकर हे दोघेही दहिसर विधानसभेसाठी इच्छूक आहे. त्यामुळे आता इथून कोण उमेदवारी अर्ज भरणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम
दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत, मात्र अजूनही महाविकास आघाडीमधील जागा वाटप निश्चित होत नसल्याचं समोर आलं आहे. अजूनही विधानसभेच्या काही मतदारसंघात महाविकास आघाडीमधील तिढा कायम आहे. सुरुवातील 85-85-85 चा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र उर्वरीत जागांवरील तिढा कायम होता. आता 90-90-90 चा नवा फॉर्म्युला समोर येत आहे, तर उर्वरीत 18 जागा या मित्र पक्षांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.