Dawood | डी गँगच्या लोकांना दाऊद दर महिन्याला 10-10 लाख रुपये पाठवत होता, ED च्या चौकशीत मोठा खुलासा
खालिदने केलेल्या खुलाशानुसार, अरुण गवळीसोबत झालेल्या गँगवॉरमध्ये 1990 मध्ये त्याचा भाऊ अब्दुल समद मारला गेला.
मुंबईः अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरील आरोपांसदर्भात सुरु असलेल्या ईडीच्या चौकशीत मोठा खुलासा करण्यात आला आहे. पाकिस्तानात असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) दर महिन्याला डी गँगच्या सदस्यांना 10-10 लाख रुपये पाठवत होता. यात इकबाल कासकर सहित इतर बहीण- भावंडांचाही समावेश होता. इकबाल कासकरलाही (Ekbal Kaskar) ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. नवाब मलिकांवरील चौकशीतील साक्षीदार खालिद उस्मान याने हा मोठा खुलासा केला आहे. खालिद उस्मान यानी सांगितलं की, दाऊद अनेकदा त्याच्या सदस्यांना १० लाख रुपये पाठवत असे. काही वेळा तर इकबाल कासकरने मला नोटांचे भले मोठे बंडलही दाखवले आहेत. दाऊदभाईंनी हे पाठवल्याचं त्यानं सांगितलं होते…
कोण आहे खालिद उस्मान ?
नवाब मलिकांविरोधातल्या चौकशीत खालिद उस्मान हा साक्षीदार आहे. खालिद उस्मानचा मोठा भाऊ अब्दुल समद हा इकबाल कासकरचा बालपणीचा मित्र होता. अब्दुल समद काही वर्षांपूर्वी तो गँगवॉरमध्ये मारला गेला. दाऊदची बहीण हसीना पारकर तसेच तिचा सुरक्षा रक्षक व ड्रायव्हर सलीम पटेल याच्याशी देखील अब्दुल समद परिचित होता. अब्दुल समदने दाऊदच्या टोळीत काम सुरु केले होते. 7 डिसेंबर 1990 मध्ये दाऊद इब्राहिमची टोळी आणि अरुण गवळीच्या गँगदरम्यान झालेल्या चकमकीत अब्दुल समद मारला गेला.
दाऊदच्या नावावर वसूली सुरु होती…
खालिद उस्मानने ईडीला दिलेल्या जबाबानुसार, सलीम पटेल दाऊदला त्याच्या नावाने ओळखत होता. दाऊद आणि इकबाल कासकरची बहीण हसीना पारकरचा ड्रायव्हर असलेला सलीम पटेल हसीना पारकरसाठी वसूली करत होता. तसेच काही जमिनीचे वाद मिटवण्यासाठीही सलीम पटेल मदत करत होता. हसीना पारकरने पैसे कमावण्यासाठी दाऊदच्या नावाचा वापर केला. सलीम आणि हसीना यांनी मुंबईतील बांद्रा येथील एका फ्लॅटवर जबरदस्तीने ताबा मिळवला होता. दाऊदच्या नावाचा वापर करून जमीनीवर कब्जा मिळवण्यासाठी तसेच वसूलीसाठी अनेकदा दाऊदचं नाव वापरल्याचं सलीमने सांगितल्याचा खुलासा खालिदने केला.
दुबईतून मुंबईत का आला होता कासकर?
खालिदने केलेल्या खुलाशानुसार, अरुण गवळीसोबत झालेल्या गँगवॉरमध्ये 1990 मध्ये त्याचा भाऊ अब्दुल समद मारला गेला. त्यावेळी इकबाल कासकर दुबईत होता. तेथून तो भारतात आमच्या आईला भेटण्यासाठी आला होता. अब्दुल समद मारला गेल्यामुळे शोक व्यक्त केला होता. तेव्हाही इकबाल कासकरने मला आणि माझा भाऊ शब्बीर उस्मानला बोलावले होते. विशेष म्हणजे शब्बीर उस्मान सद्या एका ड्रग्ज प्रकरणी जेलमध्ये आहे.
‘दाऊद पाकिस्तानातच’
इकबाल कासकर आणि हसीना पारकरचा मुलगा अलिशाह (29) यांच्यासह अनेक साक्षीदारांनी दाऊद हा पाकिस्तानातच रहात असल्याचं सांगितलं आहे. दाऊदच्या पत्नीचं नाव मेहजबीन असून तिला पाच मुले आहेत. यापैकी एक मुलगा असून त्याचं नाव मोइन आहे. त्याच्या सर्वच मुला-मुलींची लग्न झआली आहेत, अशी माहिती इकबाल कासकरने दिली आहे. इकबाल कासकर सध्या मनी लाँड्रिग प्रकरणी अटकेत आहे. आणखी एक भाऊ अनिस जो मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी आहे, तोदेखील पाकिस्तानात असल्याचं कासकरने सांगितलं आहे.