पत्नी बुडत असल्याचं दिसलं, जीवाची पर्वा न करता पतीची उडी, सांगलीत तलावात बुडून दोघांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यातील भाटशिरगांव (ता शिराळा) येथे पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीसह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.
सांगली : सांगली जिल्ह्यातील भाटशिरगांव (ता शिराळा) येथे पत्नीला वाचवायला गेलेल्या पतीसह पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शेताजवळील पाझर तलावात बुडून दोघांचा मृत्यू झालाय. अर्जुन लक्ष्मण देसाई (57) आणि सुमन अर्जून देसाई (55) अशा या शेतकरी दाम्पत्यांची नावं आहेत. ही घटना बुधवारी (17 फेब्रुवारी) घडली असून यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली (Death of husband wife by drowning in lake in Sangli).
या बाबत घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, भाटशिरगावच्या अर्जुन लक्षमन देसाई (वय ५७) यांची पाझर तलावाजवळ शेत वस्ती आहे. बुधवार दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी सुमन पाझर तलावात बुडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी अर्जुन देसाई यांनी पाण्यात उडी मारून पत्नी सुमन यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला.
ही घटना घडली तेव्हा आजूबाजूला कुणीही नव्हते. मात्र, तलावाजवळच वस्तीवर असलेला त्यांचा 7 वर्षीय नातू साकेत देसाई याने ही घटना पाहिली. त्यानंतर त्याने याबाब लोकांना सांगितलं. दुपारी 3 वाजल्यापासून तानाजी गोसावी आणि पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने शोध मोहीम राबवली. अखेर सायंकाळी साडेसहा वाजता दोघांचे मृतदेह आढळून आले. यावेळी संपूर्ण गाव हळहळलं. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशीरा शोकाकुल वातावरणात भाटशिरगावमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा :
अहमदनगरमध्ये चार सख्ख्या भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू, जालन्यात पाच मुली तलावात बुडाल्या
अंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू
व्हिडीओ पाहा :
Death of husband wife by drowning in lake in Sangli