पाकिस्तानमधून खासदार नवनीत राणा यांना धमकी, व्हॉटसअॅपवर पाठवली क्लिप
Navneet Kaur Rana Death Threats : खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी ओवीसी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
अमरावती | दि. 6 मार्च 2024 : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यांना ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आली आहे. त्यांच्या मोबाईलवर हा धमकीचा मेसेज आला आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या धमकी प्रकरणास वेगळे वळण मिळाले आहे. खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणी ‘एमआयएम’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
व्हॉटसअॅपवर क्लिप
नवनीत राणा यांना व्हॉटसअॅपवर क्लिप पाठवून धमकी आली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ही धमकी आली आहे. या मेसेजमध्ये भाजपच्या मोठया मोठया नेत्यांची नावे घेतली आहे. देशाला उडवून देण्याची धमकी त्यात दिली. या प्रकरणी नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्याक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन मेसेज पाठवणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (२),67 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
गृह विभागाची चौकशी सुरु
नवनीत राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणाची गृहविभागाने गंभीर दाखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. परंतु धमकी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आली आहे. यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे.
नवनीत राणा यांचा ओवैसीवर आरोप
खासदार नवनीत राणा यांनी धमकी प्रकरणात खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी ओवीसी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. लोकसभेमध्ये खासदार ओवैसी आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर अनेकदा ओवैसीच्या कार्यकर्त्यांच्या आम्हाला धमक्या आल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी ओवैसी यांची चौकशी केल्यावर त्यांची आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरचं बाहेर येईल. या प्रकरणी आपण राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याशी चर्चा केल्याचे राणा यांनी म्हटले.