दिल्लीकर चाखणार कोकणातील हापूसची चव, आंबा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल.

उन्हाळा म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठ्या उमटतात, पण आंब्याचं नाव काढलं की तोच उन्हाळा सुसह्य होण्याची शक्यता वाढते. आंबा आवडत नाही असा माणूस विराळाच. कोकणातील हापूसची चव ही प्रत्येक आंबाप्रेमीच्या जीभेवर रेंगाळते, अगदी परदेशातही हा आंबा जातो. आता याच हापूसची चव देशाच्या राजधानीतल्या लोकांना अर्थात दिल्लीकरांनाही चाखता येणार आहे. कशी आणि कुठे ? अहो खुद्द दिल्लीत, कारण राजधानी दिल्लीमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन खुद्द देशाच्या पंतप्रधानांच्या, नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.
दिल्ली महाराष्ट्र सदन येथे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. 27 मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांच्या अभिनव संकल्पनेच्या मध्यमातून दिल्ली येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 एप्रिल व 1 मे असे दोन दिवस आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असन दिल्लीकरांना अस्सल देवगड, रत्नागिरी हापूस आंब्याची तसेच अन्य कोकणी उत्पादनांची चव चाखायला मिळणार आहे. तसेच या दोन दिवसांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र दिनी चाखता येणार खास हापूसची चव
कोकणातील देवगड व रत्नागिरीतील हापूस आंबा महाराष्ट्रात व देशभरात खूपच प्रसिद्ध आहे. कोकणातील शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा, आंब्याच्या निर्यातीला अधिक चालना मिळावी, या उदात्त हेतूने खासदार वायकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये 30 एप्रिल ते 1 मे (महाराष्ट्र दिन) पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवामुळे ग्रामीण भागातील उद्योजकांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे ही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाला केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या बरोबरच देशाच्या विविध राज्यातील खासदार व आमदारही उपस्थित राहणार आहेत.
मुंबईतील खासदार रविंद्र वायकर यांनी आंबा महोत्सवाचे नियोजन करून या महोत्सवाचे उद्घाटन देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते व्हावे यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी आंबा महोत्सवाच्या उद्घाटनास वेळ दिली आहे. प्रत्येक राज्यातील जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या फळांना जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यांनी प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेटी दरम्यान व्यक्त केले होते. दिल्लीतील जास्तीत जास्त आंबा प्रेमीनी या महोत्सवाला भेट देऊन कोकणातील आंबा, अन्य उत्पादकांना तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन खासदार रविंद्र वायकर यांनी केले.
प्रत्येक राज्याचं फळ प्रसिद्ध व्हायला पाहिजे
या महोत्सवाबाबत रविंद्र वायकर यांनी प्रतिक्रिया दिली. हा उत्सव चांगल्या प्रकारे व्हावा आणि कोकणातील शेतकऱ्यांना दिल्लीत बाजार पेठ निर्माण व्हावी हा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. दिल्लीत हापूस आंबा मिळत नसल्याचं दिसलं. त्यामुळे ज्याप्रमाणे मुंबईत मालवणी महोत्सव, कोकणी महोत्सव करतो, तसंच दिल्लीत आंबा महोत्सव करण्याचं ठरवलं. मी पंतप्रधान मोदींची भेट घेतली, त्यांनी वेळ दिली. त्यांना या आंबा महोत्सवामागची योजना सांगितली. प्रत्येक राज्याचं फळ प्रसिद्ध व्हायला पाहिजे, असं पंतप्रधानांनी सांगितलं. या महोत्सवासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क सुरू होता. अखेर 30 एप्रिल रोजी पंतप्रधान हे या आंबा महोत्सवाला येणार आहेत, असं वायकरांनी नमूद केलं. तेथे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं.