Navneet Rana| हिंमत असेल तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, नवनीत राणा यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान!
दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीतील मंदिरात हनुमान चालिसा पठण करत आहेत. यानिमित्त त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. नवनीत राणांच्या निवासस्थानापासून एक मोठी रॅली सकाळी काढण्यात आली. या रॅलीत अनेक संत-महंत आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
औरंगाबादः तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो, असं आवाहन करणाऱ्या शिवसेनेला अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असेल तर आधी औरंगजेबाच्या कबरीवर (Aurangzeb Tomb)फुलं वाहणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हाच तुम्हाला मानेल, असं वक्तव्य नवनीत राणा यांनी आज दिल्लीत केलं. आज शनिवारी नवनीत राणा आणि रवी राणा हे दिल्लीतील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करत आहेत. मंदिरात निघण्यापूर्वी राणा दाम्पत्यानी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज मोठी सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने या सभेपूर्वी तीन टीझर प्रसिद्ध करण्यात आले. त्यापैकी तिसरा टीझर काल आला. त्यात उद्धव ठाकरे यांनी उपरोक्त आवाहन जनतेला केलं आहे. तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचं काम मी करून दाखवतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला.
औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांवर कारवाई करणार का?
नवी दिल्लीतील 5 हजार वर्षांपूर्वीच्या पांडवकालीन हनुमान मंदिरात नवनीत राणा आणि रवी राणा हे आज हनुमान चालिसा पठण करणार आहेत. महाराष्ट्रात आम्ही हनुमान चालिसा म्हटलं तर आम्हाला जेलमध्ये टाकलं. 13-14 दिवस तुरुंगात ठेवलं. महिलेशी कशी वर्तणूक केली हेही जगाला माहिती आहे. माझ्या घरावर कारवाई केली. आता ओवैसी हे औरंगजेबाच्या कबरीवर गेले त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी काहीही कारवाई केली नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला.
हिंदुत्व असेल तर सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करा…
दरम्यान, उद्ध ठाकरे यांची आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व उद्धव ठाकरे यांच्यात थोडसं तरी उरलं असेल तर त्यांनी आजच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसाने करून दाखवावी, असं आव्हानही रवी राणा यांनी दिलं.
नवनीत राणांचं दिल्लीत शक्तीप्रदर्शन
दिल्लीत नवनीत राणा आणि रवी राणा दिल्लीतील मंदिरात हनुमान चालिसा पठण करत आहेत. यानिमित्त त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. नवनीत राणांच्या निवासस्थानापासून एक मोठी रॅली सकाळी काढण्यात आली. या रॅलीत अनेक संत-महंत आणि कार्यकर्ते सहभागी झाले. शेकडो कार्यकर्त्यांचा जथ्था घेऊन नवनीत राणा यांनी मंदिराकडे पायी मार्गक्रमण केलं. मंदिरात हनुमान चालिसा झाल्यावर तेथे महाआरतीदेखील करण्यात येणार आहे.