डेंग्यूच्या उपचाराचं बील 5 लाख 85 हजार, संतोष बांगर डॉक्टरांवर संतापले, ऑडिओ क्लिप व्हायरल
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एमजीएम रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरू होता, या रुग्णाचं 11 दिवसांचं बील तब्बल 5 लाख 85 हजार रुपये एवढं झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एमजीएम रुग्णालयात डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णावर उपचार सुरू होता, या रुग्णाचं 11 दिवसांचं बील तब्बल 5 लाख 85 हजार रुपये एवढं झालं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या येडूत गावचे रहिवासी असलेल्या वैभव सरकटे यांच्या भाचीला डेंग्यूची लागण झाली होती. तिला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 30 मार्चला तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिच्या 11 दिवसांच्या उपचाराचं बील 5 लाख 85 हजार रुपये एवढं आलं.
मात्र अकरा दिवस पैसे भरत राहिल्याने पैसे शिल्लक नसल्यामुळे त्यांनी याबाबत कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना आपली व्यथा सांगितली. बांगर यांनी त्यांची व्यथा ऐकल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला आणि उर्वरित बिल माफ करण्याची विनंती केली. मात्र प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही, शेवटी रात्री अकरा वाजता आरोग्य मंत्र्यांनी केलेल्या फोननंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. समोर आलेल्या माहितीनुसार जोपर्यंत पैसे भरत नाहीत तोपर्यंत रुग्णाला डिस्चार्ज नाही, अशी रुग्णालयाची भूमिका होती.
बांगर यांची प्रतिक्रिया
एक लाख 27 हजार बाकी आहेत हे त्यांनी मला सांगितलं, जोपर्यंत तुम्ही एक लाख 27 हजार देणार नाहीत तोपर्यंत तुमच्या पेशंटला डिस्चार्ज करणार नाही, अशी रुग्णालयाची भूमिका होती. मी रुग्णांच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली. त्यानंतर मला कळालं पेशंटला डेंग्यू झाला होता. डॉक्टरांचा नंबर घेण्यासाठी मला दोन तास लागले, नंबर मिळाल्यानंतर मी डॉक्टरांना विनंती केली की बाकीची रक्कम त्यांना माफ करा, पण ते म्हटले पेशंट सिरीयस होता. मी त्यांना म्हटलं तुम्ही रुग्णालयाचं बील 2 लाख 85 हजार केलं हे कितपत योग्य आहे, बाकीचे माफ करा आणि पेशंटला डिसचार्ज द्या.
बाहेर मेडिकलवर मिळणाऱ्या आठ रुपयांच्या वस्तुची किंमत तिथे तीनशे रुपये लावण्यात आली, पंधरा हजाराच्या इंजेक्शनची किंमत बाहेर साडेचार ते पाच हजार रुपये आहे. दहा पटीनं बिल वसूल करून गोर-गरीब लोकांची पिळवणूक करण्याचं काम एमजीएम रुग्णालय करत असल्याचा आरोप देखील यावेळी संतोष बांगर यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, जेव्हा त्यांच्याशी आरोग्य मंत्री बोलले तेव्हा त्यांनी एक लाख 27 हजार रुपयांचं बिल कमी केलं. त्या कुटुंबाला आपली जमीन गहान ठेवून रुग्णालयाला चार लाख रुपये द्यावे लागले. हा दवाखाना खाटीक खाना आहे, असा संताप बांगर यांनी यावेळी व्यक्त केला आहे. एवढं बिल कसं आलं, तुम्ही रुग्णाला अमृत पाजलं का असा सवालही त्यांनी यावेळी केला. दरम्यान डॉक्टर आणि आमदार बांगर यांच्या संभाजषणाची एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे, मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.