जातिनिहाय जनगणना करण्यास देवेंद्र फडणवीसांचाही पाठिंबा; छगन भुजबळ यांचा मोठा दावा
ओबीसींच्या मागण्यासाठी काही ओबीसी नेते उपोषणाला बसले आहेत. काल सरकारची महत्त्वाची बैठक झाल्यानंतर आज सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी नेत्यांच्या भेटीला आले आहेत. या दरम्यान छगन भुजबळ यांनी जातीय जनगणना करण्याती पुन्हा एकदा मागणी केली आहे.
ओबीसी नेत्यांचंं सुरु असलेले उपोषणाचा आज नववा दिवस आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर आज सरकारचं शिष्टमंडळ भेटीला आले आहे. सरकारमधील ओबीसी नेत्यांनी आज उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांची भेट घेतली. या वेळी छगन भुजबळ यांनी बोलताना पुन्हा एकदा जातिनिहाय जनगणनेची मागणी केली.
छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुल्यांनी जे सांगितलं ते शाहू महाराजांनी सांगितलं. तेच बाबासाहेबांंनी संविधानात आणलं आणि आम्हाला न्याय दिला. आमची सर्व लेकरंबाळं काही गाड्यातून फिरत नाही. ते ही अन्नाला मोताज आहेत. त्यांची काय परिस्थिती आहे. त्यासाठी हे आरक्षण आहे. त्यात इतर वाटेकरी झाले तर आमचे काय होणार.
अनेक नेत्यांना निवडणुकीत पाडलं
‘पंकजा ताई उभ्या राहिल्या. त्यांनी कधीही त्यांना विरोध केला नाही. तहीरी या लोकांनी त्यांना विरोध केला. सर्वांनी मिळून पाडलं. महादेव जानकर यांना पाडलं. आम्ही लोकसभेत जायचं नाही. आम्ही विधानसभेत जायचं नाही. आम्ही अधिकार क्षेत्रात जाऊ देणार नाही. असंच राहिलं तर लोकसभा आणि विधानसभेतही आम्हाला आऱक्षण पाहिजे. म्हणूनच म्हणतो लढाई संपली नाही, लढाई सुरू आहे. कुणी म्हणेल आज आम्ही एवढे आहोत. लोकसभेत आम्ही जास्त आहोत. विधानसभेतही जास्त आहोत.’
फडणवीसांनी पाठिंबा दिलाय – भुजबळ
‘आम्ही मागणी केलीये. देशात आणि महाराष्ट्रात मागणी केलीये. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की जातीगणनेला पाठिंबा आहे. नितीशकुमार यांनी केली. चंद्राबाबूंचं तेच म्हणणं आहे. विरोधी पक्षांचंही तेच म्हणणं आहे. सर्वांनी मागणी केली आहे.
‘शेळ्या मेंढ्या मोजता तर मग माणसांची मोजदाद का करत नाही. आमची जात गणना केली पाहिजे. काही मागितलं तर कोर्टात जातात. कोर्ट विचारतं तुम्ही किती टक्के आहात. आम्ही आकडा कसा सांगायचा. ब्रिटिशांनी गणना केली तेव्हा ५४ टक्के होतो. मग आम्ही १०-१२ टक्के आहोत असं कसं म्हणता. करा जातगणना. नितीश कुमारांनी जातजणगणना केली. आम्ही ६५ टक्क्यावर गेलो. आम्ही जातीयवाद केला नाही. त्यांनी जातीयवाद केला.’ अशा शब्दात भुजबळांनी टीका केली.