एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेणार की नाही? सस्पेन्स कायम; देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने चर्चांना उधाण
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सस्पेन्स अजून पूर्णपणे संपलेला नाही. महायुतीच्या नेत्यांनी आज राजभवनात जावून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांना पत्र देत सरकार स्थापनेचा दावा केला. भाजपचे गटनेते देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार या तीनही दिग्गज नेत्यांनी एकत्रितपणे राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर राज्यपालांनी महायुतीच्या तीनही नेत्यांना नव्या सरकारच्या शपथविधीसाठी वेळ दिला. या घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्याने शिंदे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
फडणवीसांचं शिंदेबद्दल मोठं वक्तव्य
“एकनाथ शिंदे यांना मंत्रिमंडळात राहावं अशी विनंती केली. त्यांच्या आमदारांचीही तीच विनंती आहे. त्यांचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात राहणार की नाही? याबाबतचा मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. “तिघांची शपथ होईल. आणखी कोणाचा होणार हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. कोण कोण शपथ घेणार याची माहिती संध्याकाळी देईल. गेल्या अडीच वर्षात आम्ही तिघांनी मिळून निर्णय घेतले आहे. पद ही तांत्रिक गोष्ट आहे. पण आम्ही यापुढेही तिघे मिळूनच निर्णय घेणार आहोत. राज्याला विकासाच्या मार्गावर नेणावर आहोत. जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यावर आमचा भर असेल”, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस आणखी काय-काय म्हणाले?
“आताच आम्ही महायुतीच्या वतीने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र दिलेलं आहे. नियमानुसार, राज्यात नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा सादर केला आहे. राज्यपालांनी आमचा दावा घेतल्यानंर आम्हाला 5 तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजचा शपथविधीची वेळ लिहून दिली आहे. आज भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य, स्वाभिमान, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती झालेली आहे. या सगळ्यांच्या सहीचं पत्र आम्ही राज्यपालांना दिलेलं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे की, त्यांनी शिवसेनेच्या वतीने माझ्या समर्थ पत्र दिलं, महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून मला करावं, असं पत्र राज्यपालांना दिलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देवून, मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, अशी विनंती केली आहे. सर्व मित्रपक्षांनी अशीच विनंती केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.