महायुतीची टाळी वाजणार? उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता फडणवीसही थेट बोलून गेले
उद्धव ठाकरे यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं वक्तव्य आजच्या पत्रकार परिषदेत केलं. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यांच्या मुलाखतीत तसंच वक्तव्य केलं. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कुठपर्यंत जाणार? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमधील घडामोडींनी तर तेच दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे राज्यात महायुतीचं सरकार असलं तरीही आता विरोधातील दोन पक्ष हे महायुतीत सहभागी होऊ शकतात का? अशी चर्चा आता रंगली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यातील एका गटाचं सत्तेत थेट सहभागी व्हावं, असं म्हणणं आहे. तर दुसऱ्या गटाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपला पक्ष विलीन करुन सत्तेत सहभागी व्हावं, असं म्हणणं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. इथे तशा घडामोडी सुरु असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीवेळी केलेलं एक वक्तव्य चर्चेला कारण ठरत आहे.
देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत रॅपिड फायर फॉर्मेटमध्ये प्रश्न विचारण्यात आला की, राज ठाकरे की उद्धव ठाकरे? त्यावर ते आधी हसले आणि नंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे हे मित्र झाले आहेत आणि उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “मगाशी मी सांगितलं की, राजकारणात काही पक्क नसतं. आधी उद्धव ठाकरे मित्र होते. मग राज ठाकरे मित्र झाले. आता राज ठाकरे हे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे हे शत्रू नाहीत”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
‘कुठलीही गोष्ट होणारच नाही, असं म्हणून चालणार नाही’
“शरद पवार अतिशय चाणाक्ष आहेत. त्यांनी निश्चितपणे याचा अभ्यास केला असेल की, एवढं मोठं आम्ही तयार केलेलं वायुमंडळ एका मिनिटात पंक्चर झालं तर हे करणारी शक्ती कोण? त्यांच्या लक्षात आलं की, हे नेहमी राजकारण करणारी शक्ती नाही तर ही शक्ती नियमित राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी प्रतिस्पर्ध्याचं कौतुक करावं लागतं. त्या हिशोबाने त्यांनी कौतुक केलं असावं”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“तुम्ही 2019 नंतर माझे वक्तव्ये बघितले असतील तर त्यात बराच फरक जाणवेल. कारण गेल्या पाच वर्षात इतक्या घडामोडी घडून गेल्या की, कुठलीही गोष्ट होणारच नाही, असं म्हणून चालणार नाही. काहीही होऊ शकतं. म्हणजे झालं पाहिजे असं नाही. पण काहीही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, राजकारणात काहीही होऊ शकतं. असं व्हावं असं बिल्कूल नाही. किंवा ते होणंही फार चांगलं आहे असं म्हणणार नाही. पण शेवटी राजकारणात एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की, खूप ठामपणे असं होणारच नाही, असं आपण म्हणतो तेव्हा राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन ठेवेल याचा काहीच भरोसा नाही”, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.