ईव्हीएम विरोधातील रॅलीत कोण होते? देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वकिलाचे नाव घेतले त्यानंतर विरोधक हादरले
निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करुन दाखवण्याबाबत हे आव्हान दिले होते. परंतु आयोगाकडे एकही राजकीय पक्ष गेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएम विरोधात महाविकास आघाडीकडून सुरु असलेल्या आंदोलनावरुन जोरदार हल्लाबोल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापासून निवडणूक आयोगापर्यंत सर्वांनी दिलेल्या निकालाचा दाखल दिला. तसेच ईव्हीएमविरोधात कोणाचा सहभाग होता? त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत विरोधकांना घेरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम विरोधात आलेली याचिका दोन तासांत याचिका निकाली काढली. त्या आधी ईव्हीएमवर कोर्टाने सविस्तर निर्णय दिला होता. त्यात त्यांनी आधी पूर्वीचा निकाल वाचा आणि नंतर आमच्याकडे या असे सांगितले. सर्वोच्च न्यायालयात ६२ वकिलांनी बाजू मांडली होती. त्यांनी प्रत्येक तांत्रिक मुद्द्यावर कोर्टाने भाष्य केले होते, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आयोगाच्या आव्हानानंतर कोणीच गेले नाही
ईव्हीसंदर्भात निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुले आव्हान दिले होते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करुन दाखवण्याबाबत हे आव्हान दिले होते. परंतु आयोगाकडे एकही राजकीय पक्ष गेला नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता ईव्हीएमचा मुद्दा सोडा, खुल्या मनाने जनादेश स्वीकारा. तुम्ही जोपर्यंत आत्मपरिक्षण करत नाही, तोपर्यंत तुमची परिस्थिती अशीच राहील. आम्ही लोकसभेत हरलो. आम्ही ईव्हीएमवर खापर फोडले नाही. फेक नरेटिव्हमुळे आम्ही हरलो. आता आम्ही थेट नरेटीव्हला उत्तर दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.
तुमचे आत्मपरीक्षण करा- फडणवीस
पराभवाचे तुम्ही आत्मपरीक्षण करा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही ईव्हीएम हटाव विरोधात रॅली केली. त्या रॅलीत वक्ते कोण होते. अॅड. महेमूद प्राचा. हे महेमूद प्राचा कोण आहे. ते तुम्हाला माहीत आहे का? महेमूद प्राचा हे २०१०च्या जर्मन बेकरी प्रकरणातील मिर्झा हिमायत बेगचा वकील होते. इस्रायल दुतावास हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद पीरभाई यांचा ते वकील होते. त्यानंतर दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचे ते वकील होते. लोकशाहीत तुम्हाला अधिकार आहे. आम्ही घसा फोडून पुरावे देऊन तरी सांगितले तरी तुम्ही ईव्हीएमच म्हणणार आहे. पण तुमच्या रॅलीत देशभक्त वकील आणा. आव्हाड साहेब अशा प्राचापासून दूर राहा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला.