देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधी यांना ओपन चॅलेंज, म्हणाले…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रपाचाराच्या निमित्ताने आज महायुतीची सभा पार पडली. या सभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. महायुतीचे भंडारा-गोंदियाचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा आज भंडाऱ्यात पार पडली. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना राहुल गांधी यांना चॅलेंज दिलं. “राहुल गांधी काल आले होते. राहुल गांधी काय बोलतात ते आम्हाला समजत नाही. कधी ते म्हणतात, इकडून आलू टाकला तर तिकडून सोनं निघतं. कधी ते विचारतात, पांडवांनी जीएसटी लावला होता का? आता अशा प्रश्नांची उत्तरे आम्ही काय द्यायची? ते काल इथे येऊन राहुल गांधी ओबीसींबाबत बोलले. मी राहुल गांधी यांना आव्हान देतो, तुम्ही 60 वर्षे राज्य केलं. तुमच्या 60 वर्षात तुम्ही ओबीसींसाठी काय केलं ते सांगा. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारने ओबीसींसाठी काय केलं ते आम्ही सांगतो. होऊन जाऊदे शर्यत”, असं खुलं चॅलेंज देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांना दिलं.
“तुमच्यापेक्षा जास्त गोष्टी आम्ही ओबीसींसाठी केल्या. त्यामुळे या देशातील ओबीसी समाज आमच्या पाठिशी आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांचा सर्वाधिक ओबीसी समाजाचे मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे. या महाराष्ट्रात इतके वर्ष तुमचं राज्य होतं. तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही. आमचं सरकार ज्यावेळेस आलं, मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं. या महाराष्ट्रात आजपर्यंत ओबीसी हिताचे 30 मोठे निर्णय झाले. यापैकी 28 निर्णय हे माझ्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले. ओबीसींकरता हॉस्टेल, शिष्यवृत्ती असेल, स्वयं योजना आणली. आमच्या ओबीसी विद्यार्थ्यांकरता महाज्योतीसारख महामंडळ स्थापन केलं. तुम्ही इतके दिवस ओबीसींकडे बघितलसुद्धा नाही”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
‘…तर ते मत राहुल गांधींना मिळतं’
“देशात कोण पंतप्रधान असेल? यासाठी ही निवडणूक आहे. आपण सुनील मेंढे यांना आपण मत देतो, कमळाचं बटन देतो तेव्हा ते मत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतं. दुसरं कुणाला मत दिलं तर ते मत थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मिळतं. या देशात दोन खेमे तयार झाले आहेत. एकीकडे विकासपुरुष, जगातील सर्वात लोकप्रिय नेते नरेंद्र मोदी आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपले घटकपक्ष आहेत. आपली महायुती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई आहे, आता मनसे पक्षदेखील सोबत आलेला आहे. आपली मोठी महायुती आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘राहुल गांधींच्या ट्रेनला डब्बेच नाहीत’
“आमच्या महायुतीचं इंजिन नरेंद्र मोदी आहेत. आमच्या सर्वांचे डब्बे त्याला लागलेले आहेत. ही विकासाची ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये बसण्यासाठी प्रत्येकाला जागा आहे. दीन, दलित, गोर-गरीब, आदिवासी, शेतकरी, शेजमजूर, अल्पसंख्याक, प्रत्येकाला बसवून मोदींच्या नेतृत्वात ही विकासाची ट्रेन पुढे जात आहे. पण राहुल गांधींची ट्रेन कशी आहे? त्या ठिकाणी डब्बे नाहीत. इंजिनमध्ये कुणाला बसण्याची संधी असते का? इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. तिथे इंजिनही एक नाही. शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे, राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे, लालूप्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे. यांचे इंजिन विरुद्ध दिशेला चालले आहेत. कुणी इंजिन दिल्लीकडे ओढतं, तर कुणी बारामतीकडे ओढतं, कुणी मुंबईकडे ओढतं, तर कुणी कोलकाताकडे ओढतं. यांचं इंजिन जागेवरुन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही. अशी ठप्प गाडी घेऊन राहुल गांधी या ठिकाणी आलेले आहेत. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या गाडीमध्ये बसून आपल्याला पुढे जायचं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.