देवेंद्र फडणवीस देशाचे भावी पंतप्रधान… पण, उद्धव ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराने व्यक्त केली इच्छा
सरकारला आणि फडणवीस यांना माझे एकच सांगणे आहे. आम्ही तुम्हाला देशाचे भावी पंतप्रधान म्हणून मोठ्या आशेने पाहतो. मात्र इतक्या...
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे आक्रमक नेते म्हणून भास्कर जाधव यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपवर टीका करताना ते अधिकच आक्रमक होतात. याच आक्रमक भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहतो असे म्हटले. पण, त्यांनी सुडाचे राजकारण करू नये असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काँग्रेस नेते सत्तेचा पाळणा घेऊनच जन्माला आले होते. मात्र, भाजपचे तसे नाही. भाजपची तब्बल ५० वर्षे विरोधी पक्षातच गेली आहेत हे लक्षात ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. २०१४ नंतरचा काही काळ सोडला तर भाजपाची तब्बल ५० हून अधिक वर्षे विरोधी पक्षात गेली आहेत. संसदेत कधी काळी २ खासदार असलेला हाच भाजपा पक्ष आहे. शिवसेनेमुळे माझाही काळ मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातच गेला आहे. मात्र यापूर्वी कधीही इतक्या सूडाने विरोधी पक्षातील आमदारांशी वागण्यात आले नव्हते अशी टीका जाधव यांनी केली.
ज्या कॉंग्रेसची देशात आणि राज्यात सत्ता होती त्या काँग्रेसचे मंत्री विरोधी पक्षाचा आमदार भेटायला आला तर स्वतः आवर्जून जागेवरुन उठून उभे रहायचे. विरोधकांची कामे करुन द्यायचे. मात्र, आता राज्यात सत्तेत असलेली मंडळी जाणूनबुजून सूडाने वागत आहेत. विरोधकांशी सूडाने वागू नका, विरोधकांच्या मतदारसंघातील विकासकामे हेतुपरस्पर रोखू नका अशा शब्दात त्यांनी फडणवीस यांना खडसावले.
हे म्हणे जनतेचे मुख्यमंत्री
आमच्या सरकारने माझ्या मतदारसंघातील मंजूर केलेल्या विकासकामाना स्थगिती दिली. विकासकामांबाबत मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत कामांच्या फाईल्स घेऊन फिरलो. पण, जनतेचे मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री यांनी स्थगिती उठवली नाही. उलट येत्या एक महिन्यात भास्कर जाधवला तुरुंगात कसे टाकता येईल यासाठी संबंधितांना आदेश देण्यात आले आहे असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
गुडघे टेकणार नाही
आमदार राजन साळवी, वैभव नाईक यांच्यासह अनेक आमदारांच्या चौकशा सुरु आहेत. सूडाने विरोधकांशी वागू नका. तुम्ही कितीही चौकशा मागे लावा, जेल मध्ये टाका, मतदारसंघातील विकामकामे रोखा काहीही करा. मात्र, मी गुडघे टेकणार नाही हे लक्षात ठेवा, असे ठणकावून सांगतानाच आम्ही तुम्हाला देशाचे भावी पंतप्रधान म्हणून मोठ्या आशेने पाहतो, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला.