पोटनिवडणूका बिनविरोध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन…पण, नाना पटोले यांच्या विधानानंतर निवडणुकीत कोणता ट्विस्ट येणार?
एकीकडे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे पुण्यातील दोन्हीही निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी दुसरीकडे कॉंग्रेसच्या नाना पटोले यांनी दिलेली प्रतिक्रिया निवडणुकीत ट्विस्ट आणणारी ठरू शकते.
पुणे : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. सध्या पुण्यात याच दोन्हीही पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत बैठका घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन याबाबत आढावा घेतला आहे. यावेळी ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करणार असल्याचे म्हंटले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीत ट्विस्ट येईल असं विधान केलं आहे. कॉंग्रेसने कसबा पेठेत तयारी केली आहे. मात्र, अजून भाजपने तसा काही प्रस्ताव पाठविला नाही त्यामुळे तशी चर्चा करण्याचे कारण नाही असं म्हंटलंय. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही ठिकाणच्या निवडणुकीत ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.
बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील दोन्ही निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली आहे. याशिवाय बिनविरोध निवडणूक करण्यासाठी तयारीही दुसऱ्या बाजूला भाजपकडून सुरू आहे.
तर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जून संदर्भ दिले आहे. गोपीनाथ मुंढे गेले त्यावेळी कॉंग्रेसने बिनविरोध निवडणूकीची परंपरा सुरू केली होती.
पण भाजपने ही परंपरा मोडली आहे. उमेदवार देण्याची सुरुवात त्यांनी केली आहे. त्यामुळे चर्चा करण्याचे कारण नाही, अजून भाजपने तसा प्रस्तावही दिला नाही. पण कॉंग्रेसने तयारी सुरू केल्याचे म्हंटले आहे.
देवेंद्र फडणवीस एकीकडे निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती करू असे म्हणत असले तरी दुसरीकडे कॉंग्रेसचे नाना पटोले हे निवडणूक लढण्याची भाषा करत आहे.
त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामध्ये कॉंग्रेसकडून इच्छुक उमेदवारही कामाला लागले आहे. तर भाजपकडून उमेदवार कोण असणार याबाबत गोपनीयता बाळगळी जाते.
स्वर्गीय आमदारांच्या घरातीलच उमेदवार दिल्यास कदाचित ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार कोण असणार यावर निवडणुकीची स्पष्टता होणार आहे.