नारायण राणे म्हणाले, ‘घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन’, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया काय?
मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आज ठाकरे गटाचे आणि राणे समर्थक कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी नारायण राणे यांनी 'घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन', असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट येथील पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आज महाविकास आघाडीचे नेते पाहणीसाठी तिथे गेले. विशेष म्हणजे भाजप खासदार नारायण राणे आणि भाजप नेते निलेश राणे हे देखील कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले. यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात मोठा राडा झाला. जवळपास दोन तासांपेक्षा जास्त वेळ राजकोट किल्ल्यावर हायव्होल्टेज घडामोडी घडल्या. अखेर पोलीस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळलं. यावेळी संतापात असलेले नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. “घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन”, असं नारायण राणे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटेनवर प्रतिक्रिया दिली.
“राणेंची बोलण्याची पद्धत आहे. ते बोलताना आक्रमक असतात. पण ते धमक्या देतील असं माहीत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “ज्याप्रकारे शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे. त्यावर कोणीच राजकारण करू नये हे मत आहे. ही घटना सर्वांसाठी कमीपणा आणणारी आहे. दु:खद आहे. त्याचवेळी अशी घटना झाल्यावर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. तिथे भव्य पुतळा उभारला पाहिजे. या तिन्ही गोष्टीची कार्यवाही सुरू आहे. नेव्हीने चौकशी समिती स्थापन केली आहे. नेव्ही या संदर्भात चौकशी करून कारवाई करेल. दोषींवर कारवाई करेल. घटनेकरता कोणती गोष्ट जबाबदार होती. त्यात कोणती त्रुटी होती ते पाहिल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘खालच्या प्रकारचं राजकारण करू नका’
“पीडब्ल्यूडीने गुन्हा दाखल केला आहे. पोलीसही कारवाई करणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नेव्हीला मदत करून भव्य पुतळा उभा करू. ही घटना घडल्यावर जी जी गोष्ट करायचं ते करत आहोत. पण त्याचवेळी प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचं, प्रत्येक गोष्टीला निवडणुकीच्या चष्म्यातून पाहायंच असं खालच्या प्रकारचं राजकारण करू नये. अशा चुका घडू नये. ज्यांनी चुका केली त्यांना शिक्षा करू. तिथे पुन्हा पुतळा उभा करू”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
‘या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही’
“आता कोणी काय केलं हे बोलणार नाही. पण सर्वांना विनंती आहे, आणि सूचना आहे. या विषयाचं राजकारण करणं महाराष्ट्राला शोभत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “माजी केंद्रीय मंत्री शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. हा पुतळा नेव्हीने तयार केला आहे. तो राज्य सरकारने तयार केला नाही हे त्यांना माहीत आहे. एका ठिकाणी भ्रष्टाचाराचं तारतम्य आणि दुसरीकडे नाही असं कसं म्हणायचं. इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराला पवार साहेब समर्थन करतात का. निवडणुका पाहून वक्तव्य केलं जात आहे. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना शोभत नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नारायण राणे काय म्हणाले, पाहा व्हिडीओ, जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” ही भाषा आहे माजी केंद्रीय मंत्र्यांची ! तीही कोणासाठी, तर राजकोट किल्ल्यावर जमलेल्या शिवप्रेमींसाठी..!
एक तर भ्रष्टाचार करायचा, आणि त्यातून नुकसान झालं, तो उघड झाला की ही गुंडगिरी करायची. भाजपच्या नादाला लागलेल्या या मंत्र्यांनी कोकणासह… pic.twitter.com/zsYeDWBhgO
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 28, 2024