मनसे-भाजपची युती पक्की?; देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ विधानाने चर्चा
उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष आहेत. तर महायुतीत चार प्रमुख पक्ष आहेत. महायुतीत अजित पवार आल्यानंतर मनसेही महायुतीत सामील झाला आहे. महायुतीत येऊन राज ठाकरे एकही जागा लढवत नाहीये. मात्र, असं असलं तरी भाजप आणि मनसेची युती ही फक्त लोकसभेपुरती मर्यादित राहणार नसून ती विधानसभेतही राहणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तसं विधान केल्याने त्याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी मनसेसोबत विधानसभेतही युती कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्ही लोकसभेत मनसेला जागा देऊ शकलो नाही. कारण महायुतीत आम्ही तीन पक्ष होतो. जागा फक्त 48 होत्या. त्यामुळे मनसेला जागा देता आल्या नाहीत. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा विचार करण्यात येणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मनसे आणि भाजपची युती आता फक्त लोकसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित राहणार नसून ही युती आता विधानसभेतही कायम राहणार आहे. या निमित्ताने भाजपला एक मित्र पक्षही मिळाला आहे.
राज ठाकरे यांचा सभांवर जोर
मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांच्या महायुतीसाठी सभा झाल्या नव्हत्या. त्यामुळे राज ठाकरे हे महायुतीसाठी सभा घेणार की नाही? अशी चर्चा होती. पण राज ठाकरे यांनी पहिली सभा नारायण राणे यांच्यासाठी तळकोकणात घेतली. त्यानंतर त्यांनी पुण्यातही महायुतीच्या उमेदवारासाठी सभा घेतली. राज ठाकरे आज ठाण्यात सभा घेणार आहेत. महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी राज ठाकरे कळव्यात सभा घेणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरे मुलाखत
उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यावर काय टीका करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवाय राज ठाकरे यांनी सर्व हिंदूंनी महायुतीच्या उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन केलं आहे. या आवाहनाला विरोधक फतवा म्हणत आहेत, त्यावरही राज ठाकरे भाष्य करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.