चांगलं काम केलं तर ईडीची नोटीस मिळत नाही, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला
"चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही", असा टोला संजय राऊत यांनी लगावला (Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED).
सांगली : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या विषयावर सविस्तर बोलणं टाळलं. मात्र, या मुद्द्यावरुन त्यांनी शाब्दिक चिमटे काढले. “मी ईडी प्रवक्ता नाही, त्यांनाच विचारा. कुणी चांगलं काम केलं तर त्यांना नोटीस मिळत नाही. चूक नसेल तर कुणी घाबरण्याचे कारण नाही”, असा टोला त्यांनी लगावला (Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED).
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर त्यांनी ट्विटरवर आपली पहिला प्रतिक्रिया दिली. राऊत यांनी हिंदीमध्ये “आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया”, असं ट्विट करत ईडी आणि भाजप सरकारला अप्रत्यक्ष आव्हानच दिलं आहे. त्यांच्या या ट्विटबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांवर निशाणा साधला.
“संजय राऊत ट्विट करत असतात. त्यांच्यामध्ये खूप प्रतिभा आहे. त्यांना अनेक शेर-गाणी पाठ आहेत. त्यांना दुसरं काम नसतं, त्यावेळी ते शेर आणि गाणं ट्विट करत असतात. त्यावर मी उत्तर कशाला देऊ?”, असं फडणवीस म्हणाले. इचलकरंजीत रयत क्रांती संघटना आणि भाजपच्या आत्मनिर्भर यात्रेची सांगता सभा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या अकाउंटमधून काही व्यवहार वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याच व्यवहाराशी संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहेत. विशेष म्हणजे प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. याप्रकरणी संजय राऊत सोमवारी (28 डिसेंबर) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत (Devendra Fadnavis reaction on Sanjay Raut Wife Varsha Raut Summons By ED).
दरम्यान, संजय राऊत यांच्या पत्नीला देण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपचे जे अलिशान कार्यालये आहेत त्यामध्ये ईडी, सीबीआय या केंद्रीय यंत्रणांनी कार्यालये शिफ्ट करावे. त्यांनी अधिकृतपणे त्याबाबत घोषणा करावी. ईडी भाजपच्या विरोधकांसाठी काम करत आहे. भाजपचे विरोधी आहेत म्हणून जुने प्रकरण उकळून काढून केवळ त्रास दिला जातोय. जनतेलाही हे समजलं आहे. ईडीने आता नाटकबाजी करण्यापेक्षा भाजपच्या विरोधकांसाठी आम्ही करत आहोत ते अधिकृतपणे सांगावं”, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
संबंधित व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट
संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?