महायुतीच्या जागावाटपावर देवेंद्र फडणवीस यांच सर्वात मोठं वक्तव्य, मित्रपक्षांना सन्मानजनक जागा देणार?
आगामी लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जाणार, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलं आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला महायुतीच्या जागावाटपाबाबत जी आकडेवारी समोर येत आहे त्यामध्ये अजित पवार गटाला केवळ 3 किंवा 4 जागा दिल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर शिंदे गटाला 8 जागा दिल्या जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांचं याबाबतचं वक्तव्य महत्त्वाचं आहे.
संदीप राजगोळकर, Tv9 प्रतिनिधी, नवी दिल्ली | 6 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपाबाबत सध्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे नेते जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजप मित्र पक्षांच्या ताब्यातील जागांवरही उमेदवार देण्याबाबत चर्चा होणार असल्याचा तर्कवितर्क राजकीय वर्तुळात लढवला जात आहे. विशेष म्हणजे भाजप तब्बल 37 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. तर शिंदे गटाला 8 आणि अजित पवार गटाला केवळ 3 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या जागावाटपाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्यानंतर आता भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सावध भूमिका देण्यात आली आहे. महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिल्या जातील, असं स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
“महायुतीतील मित्रपक्षांना सन्मानजनक जागा दिली जाणार आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबत माध्यमांत आलेले आकडे हे चुकीचे आहेत”, अशी माहिती स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याबाबत प्रतिक्रिया दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील महायुतीची अंतिम जागावाटपाची बैठक दिल्लीतच होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या हायकमांडचे दिग्गज नेते असणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘ही न्यूज धादांत चुकीची’
“खरं म्हणजे ही पतंगबाजी आहे. एक आकडी जागा मिळणार किंवा तितकेच मिळणार वगैरे, मला असं वाटतं की, अशाप्रकारे पतंगबाजी करणं अतिशय अयोग्य आहे. आमचे जे दोन्ही साथीदार आहेत त्यांना आम्ही योग्य सन्मानाप्रमाणे जागा देऊ. त्यामुळे मीडिया स्वत:हून ठरवत आहे की, एवढ्या जागा मिळणार, तेवढ्या जागा मिळणार ते बंद केलं पाहिजे. ही न्यूज धादांत चुकीची आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दिल्लीत नेमकी काय चर्चा होणार?
“लोकसभेच्या निवडणुका आहेत. निवडणुकीच्या दृष्टीने एकूण निवडणुकीची रणनीती काय असेल, निवडणुकीचं वेळापत्रक काय असेल, आम्ही सगळ्यांनी काय करायचं, अशा सगळ्या गोष्टींच्या संदर्भात प्रत्येक राज्याच्या कोअर कमिटीशी पक्षाचं केंद्रीय नेतृत्व चर्चा करत आहेत. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्राला देखील या ठिकाणी बोलावलेलं आहे. त्यांची आमच्याशी चर्चा होईल”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“आपण भाजपच्या पहिल्या यादीच्या वेळी पाहिलं असेल जिथे युती आहे त्याठिकाणीची नावे यादीत आली नाहीत. कारण युतीतल्या पक्षांसोबत चर्चा करुन उमेदवार जाहीर करायचे असतात. त्यामुळे ज्या राज्यांमध्ये फक्त भाजप पक्ष लढतो तिथल्या जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता महायुतीचे राज्यांच्या उमेदवारांची देखील माहिती समोर येईल. योग्यवेळी सर्व माहिती मिळेल. आमचे जे काही निर्णय होतील ते आमच्या तुमच्यापर्यंत पोहोचवूच”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली.