फडणवीस म्हणतात भाजपाची वाटचाल पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचाराने, तर चंद्रकांत पाटील म्हणतात…
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळे झाले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी केले.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) राबवत असलेल्या गरीब कल्याणाच्या योजना पंडीत दीनदयाळ उपाध्याय (Dindayal Upadhyay) यांच्या विचारांवर आधारित आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचे संस्कार हे दीनदयाळजींच्या विचारांमुळे झाले असून भाजपा त्यांच्या विचारांवर वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. ते गोवा येथून व्हर्चुअल पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सेवेला महत्त्व दिले तसे महत्त्व अन्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिले नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांवरील सेवेचा संस्कार हा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांमुळे आहे. भाजपा दीनदयाळजींच्या विचारांवरच वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत असलेल्या सर्वांसाठी घरे, उज्वला योजना, उजाला योजना अशा गरीब कल्याणाच्या योजनांमध्येही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांची प्रेरणा दिसेल. आत्मनिर्भर भारत हे दीनदयाळजींच्या चिंतनाचे पुढचे पाऊल आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडलेला एकात्म मानवाद आणि त्यांच्या विचारांसाठी संपूर्ण भारत त्यांचा ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी फडणवीसांनी दिली.
पुतळा कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल
चंद्रकांत पाटील म्हणाले पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी महान विचार मांडले आणि जनसंघाच्या माध्यमातून हे तत्त्वज्ञान रुजवले. पक्षाच्या स्थापनेपासून सोळा वर्षे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी अपार कष्ट करून जनसंघ हा पक्ष वाढविला. माणसाला पोटाबरोबर मनाची, बुद्धीची आणि आत्म्याचीही भूक असते. याचा एकत्र विचार केला पाहिजे, असा आग्रह धरणारा एकात्म मानववाद पंडित दीनदयाळजींनी मांडला. दीनदयाळजींच्या विचारांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीब कल्याणाच्या योजना राबवत आहेत. ते म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा स्मृती दिन हा भाजपासाठी समर्पण दिन असतो. त्यांच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे आपण पक्ष पुढे नेत आहोत. भाजपा प्रदेश कार्यालयातील पंडितजींचा पुतळा कार्यकर्त्यांना प्रेरणा देईल, असे त्यांनी सांगितले.
दरेकर, शेलार काय म्हणाले?
दीनदयाळजींचे विचार आजच्या राजकारणातही समर्पक ठरतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताची निर्मिती होत आहे व त्याचे प्रणेते दीनदयाळ उपाध्याय आहेत, असे आशिष शेलार म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी जनसंघाच्या समर्पित आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजही त्यांच्या विचारांनुसार पक्षाचे कार्यकर्ते वाटचाल करत आहेत, अशी प्रतिक्रिया दरेकारांनी यावेळी दिली.