Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार थांबवायचा? फडणवीसांनी आघाडीला फॉर्म्यूला सांगितला
Rajya Sabha Election : आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तीन उमेदवार निडून येणार आहेत. आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. मग घोडेबाजाराचा प्रश्नच उद्भवणार नाही.
मुंबई: राज्यसभा (rajya sabha) निवडणुकीत घोडेबाजार थांबवण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट आघाडीलाच फॉर्म्युला सांगितला आहे. भाजपच्या (bjp) तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांचेही तीन उमेदवार आहेत. पण आम्ही घोडेबाजार करणार नाही. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. म्हणजे घोडेबाजारच होणार नाही, असं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सांगितलं. आमचे तीन खासदार राज्यसभेत जातीलच. त्याबाबत कोणतीच झिकझिक होणार नाही. आमचे तीन खासदार होते. तिन्ही खासदार संसदेत पाठवणार आहोत. यात खरेदीविक्री, घोडेबाजाराचा प्रश्नच येत नाही, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, भाजपकडून आज धनंजय महाडिक, पीयूष गोयल आणि अनिल बोंडे यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांनाच हे आवाहन केलं.
आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तीन उमेदवार निडून येणार आहेत. आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार आहेत. त्यांनी त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा. मग घोडेबाजाराचा प्रश्नच उद्भवणार नाही. जरी त्यांनी उमेदवार ठेवला तरी आम्ही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार भाजपचे आहेत. महाराष्ट्रातील आहे. राजकीय क्षेत्रात सक्रिय आहे. काही लोकं आम्हाला मतदान करणार आहेत. याचा आम्हाला विश्वास आहे. यावेळी आम्ही तिसऱ्या उमेदवाराचा फॉर्म भरलाय तो काही विचारपूर्वकच भरला आहे. त्यामुळे तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
स्टॅटेजी मीडियासमोर बोलत नसतात
तुम्ही तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही स्टॅटेजी करणार आहात का? असा सवाल केला असता जे स्टॅटेजी करतात, ते मीडियासमोर बोलत नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
शिवसेनेने धोका दिला
यावेळी पीयूष गोयल यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. आमचे तिन्ही उमेदवार हे भाजपचे कर्मठ शिपाई आहेत. त्यामुळे आम्ही निवडून येऊ. त्यामुळे घोडेबाजार करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच शिवसेनेने आमच्या बळावर आमदार निवडून आणले. पण आमच्या पाठीत खंजीर खूपसून इतरांसोबत सत्ता स्थापन केली, असा आरोप पीयूष गोयल यांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार चांगलं होतं. त्याची लोक आजही आठवण करतात, असंही त्यांनी सांगितलं.
मोदींचे आभार
मी महाराष्ट्राचा आहे. मुंबईचाच माझा जन्म आहे. मला पुन्हा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. त्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचा आभारी आहे, असंही गोयल म्हणाले.