Tv9 Special Report : तीन पक्षांचा भव्य मोर्चा, संपूर्ण ठाकरे कुटुंब पहिल्यांदाच रस्त्यावर, पण देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका
मुंबईत महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला. यातून राज्यपाल कोश्यारींसह शिंदे भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका झाली. उद्धव ठाकरेंनी विराट मोर्चा निघाल्याचा दावा केला. तर फडणवीसांनी नॅनो मोर्चा म्हणत खिल्ली उडवली.
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना हटवा ही प्रमुख मागणी घेवून, महाविकास आघाडी मुंबईच्या रस्त्यावर उतरली. उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समाजवादी पार्टी, कम्युनिस्टांसह शेतकरी कामगार पक्ष अशा महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते एकाचवेळी महामोर्चात सहभागी झाले. पण महाविकास आघाडीच्या या मोर्चाला उपमुख्यमंत्री फडणवीसांनी नॅनो मोर्चा म्हणत, मोर्चाला अयशस्वी ठरल्याचं म्हटलंय.
मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण ठाकरे कुटुंब मोर्चात सहभागी झालं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. रश्मी ठाकरे होत्या. आदित्य ठाकरे सहभागी झाले. आणि तेजस ठाकरेंनीही मोर्चात हजेरी लावली. आदित्य ठाकरेंनी तर मोर्चातून खोक्यांवरुन घोषणा दिल्या.
भाषणातून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाबरोबरच, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि प्रसाद लाडांवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारमधल्या या मंत्र्यांचा आणि नेत्यांचा उल्लेख त्यांनी लफंगे असा केला.
महामोर्चा यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडीनं पूर्ण ताकद लावली. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले यांनी मोर्चाच्या माध्यमातून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न केला आणि शक्तिप्रदर्शनही केलं.
क्रुडास कंपनी पासून मोर्चाला सुरुवात झाली. नंतर मोर्चा जे.जे. ब्रीजवरुन निघाला. त्यानंतर कार्यकर्ते सीएसटीच्या परिसरातील हज हाऊस परिसरात आले. नंतर टाईम्सच्या इमारतीसमोरच सभा पार पडली आणि मोर्चाची सांगता झाली.
तर मोर्चातून संजय राऊत आणि नाना पटोलेंनी सरकारची डेडलाईनंच जाहीर केली. फेब्रुवारीपर्यंत किंवा फेब्रुवारीनंतर शिंदे-फडणवीस सरकार दिसणार नाही, असा दावाच राऊत आणि पटोलेंनी केला.
मोर्चात, उद्धव ठाकरेही पायी चालले, ठाकरेंच्या बाजूला अजित पवार आणि पटोलेही होते. तर टाईम्स इमारतीजवळ झालेल्या सभास्थळी शरद पवार आले आणि पवारांनीही आपलाही सहभाग नोंदवला.
राज्यपालांना हटवा, बेळगाव निपानीसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच हवा, सीमावादावर सरकारनं ठोस भूमिका घ्यावी या मागण्यांसाठी महाविकास आघाडीनं मोर्चा काढला. राऊतांनी बोम्मईवर सरकारलाच आव्हान दिलं.
तर महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनंही आंदोलनं केलीत. संजय राऊतांचं डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मस्थानावरील वक्तव्य आणि अंधारेंचं संतांबद्दल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपनं माफी मांगो आंदोलन केलं.
सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडी मोर्चाच्या माध्यमातून पहिल्यांदाच अशाप्रकारे एकत्र आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चा यशस्वी झाल्याचा दावाही केला. तर नॅनो मोर्चा म्हणत, फडणवीस खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.