Suresh Dhas Exclusive Interview: आमदार सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा? ‘टीव्ही ९ मराठी’च्या ‘एक्स्क्लुझिव्ह’ मुलाखतीत धस यांचा मोठा दावा
Suresh Dhas Exclusive Interview: सातपुडा बंगल्यावर बैठक झाली. त्या बैठकीत तीन कोटी मागितले. नितीन बिक्कड, वाल्मिक कराड बैठकीत होता. त्या बैठकीत धनंजय मुंडेही होते. खंडणी प्रकरण त्या दिवशी घडले. नितीन बिक्कड त्या ठिकाणी होते, त्याचे पुरावे मी देतो.
Suresh Dhas Devendra Fadnavis: राज्यभरात बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापले आहे. या प्रकरणासंदर्भात स्थानिक भाजप नेतेही रस्त्यावर उतरले आहेत. त्यात भाजप आमदार सुरेश धस यांनी आघाडी घेतली आहे. सुरेश धस रोज आक्रमक वक्तव्य करत असून महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून सुरेश धस यांना थांबवले गेले नाही. त्यामुळे सुरेश धस यांच्यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचे विरोधी पक्ष सांगत आहेत. शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात आरोप केला. त्यावर ‘टीव्ही ९ मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत आमदार सुरेश धस यांनी स्पष्ट कबुली दिली आहे.
सुरेश धस नेमके काय म्हणाले?
खासदार संजय राऊत यांनी म्हटले की सुरेश धस जे बोलतो तो फडणवीस यांचा आवाज आहे. त्या प्रश्नावर बोलताना सुरेश धस म्हणाले की, साहेबांचा आवाज नाही. मला यासंदर्भात फडणवीस साहेब काहीच बोलले नाही. परंतु त्यांना मी जे करतो, ते आवडले नसते तर त्यांना थांबा, म्हटले असते. त्यांनी तसे काहीच म्हटले नाही, असे स्पष्टपणे सुरेश धस यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुरेश धस यांना पाठिंबा असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांच्यासंदर्भात म्हणाले…
आमदार सुरेश धस यांनी म्हणाले की, अजित पवार धनंजय मुंडे यांना पाठिशी घालत आहेत. कोट्यवधीचा वाळू उपसा प्रकरण बीडमध्ये घडत आहे. मी मागणी केल्यानंतरही दादा त्यांचा राजीनामा घेतील, असे मला वाटत नाही. परंतु माझा पक्ष भाजप आहे. माझे नेते देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दल मी जास्त बोलू शकत नाही. धनंजय मुंडे माझे शत्रू नाही. परंतु त्यांनी चौकशी होईपर्यंत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.
अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर…
अजित पवार यांची दिलगिरी का व्यक्त केली? त्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले, मी अजितदादासोबत अनेक वर्ष काम केले. त्यामुळे चुकून माझ्याकडून अरे तुरे शब्द गेले. ते होण्यास नको होते. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो.
सातपुडा बंगल्यावर बैठकीत काय झाले?
सातपुडा बंगल्यावर बैठक झाली. त्या बैठकीत तीन कोटी मागितले. नितीन बिक्कड, वाल्मिक कराड बैठकीत होता. त्या बैठकीत धनंजय मुंडेही होते. खंडणी प्रकरण त्या दिवशी घडले. नितीन बिक्कड त्या ठिकाणी होते, त्याचे पुरावे मी देतो. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा का? या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले, हे मी आज काही सांगू शकत नाही. परंतु चौकशीत समोर आले तर गुन्हा दाखल होईल. खंडणी आणि हत्येचा प्रकरण एकच आहे. ३०२ मध्ये वाल्मिक कराड आरोपी झालाच पाहिजे. या प्रकरणात कोणाचा तरी पीए सीसीटीव्हीमध्ये अडकला आहे. पैसे घेताना तो सापडला आहे. जोशी नावाचा पीए आहे. तसेच आणखी एक पीए आहे, असे धस यांनी सांगितले.