Maharashtra CM swearing-in ceremony: ‘मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस शपथ घेतो की…’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधीचा सोहळा हा अतिशय भव्यदिव्य असा ठरला. खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह 22 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. भाजपचे महाराष्ट्रातील नंबर वनचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे 21 वे मुख्यमंत्री बनले आहेत. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळालं. महायुतीला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असं यश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला आणि आघाडीला इतकं यश मिळालेलं नव्हतं. या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. पण तरीदेखील महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
या भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे स्वत: उपस्थित होते. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.
या नव्या पर्वात देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, जलयुक्त शिवार योजना अशा महत्त्वकांक्षी योजनांना नवं वळण देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, राज्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईचं संकट कसं दूर होईल, शेतकऱ्यांना हवा तितका हमीभाव देण्यापासून मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणांच्या मुद्द्यांचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.
देवेंद्र फडणवीस हे तसे हुशार आणि मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यांनी याआधी 2014 ते 2019 असे सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी योग्यपणे पार पाडून स्वत:ची क्षमता याआधीच सिद्ध केली आहे. त्यांची पक्ष संघटनेत असलेली पकड, प्रशासनात असलेला दबदबा आणि विविध प्रश्नांबाबत असणारं ज्ञान यामुळे त्यांच्याकडे महाराष्ट्राची जनता खूप आशेने पाहत आहे. त्यामुळे या नव्या देवेंद्र पर्वात ते कशाप्रकारे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कामं करतात, महाराष्ट्रात कशाप्रकारे नवे उद्योगधंदे आणतात, जीवनाश्यक वस्तूंचे भाव कसे नियंत्रणात ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यांच्या या नव्या पर्वासाठी ॉकोट्यवधी देशवासीयांकडून सध्याच्या घडीला त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय.
TV9च्या बातमीवर आज पूर्णपणे शिक्कामोर्तब!
दरम्यान, महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, या TV9च्या बातमीवर आज पूर्णपणे शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या आमदारांच्या बैठकीत, फडणवीसांची काल विधी मंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर आज संध्याकाळी साडे 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. अपेक्षेप्रमाणं देवेंद्र फडणवीसांची काल भाजपच्या गटनेतेपदी निवड झाली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात फडणवीस पर्वाची सुरुवात झाली आहे. भाजपच्या कालच्या बैठकीत नेता निवड करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि त्यानंतर, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि संजय कुटेंसह आणखी 8 नेत्यांनी समर्थन केलं होतं. नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत फक्त फडणवीसांच्याच नावाचा एकमेव प्रस्ताव आला आणि एकमताने फडणवीसांची निवड झाल्याची निरीक्षक विजय रुपाणी यांनी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीसांची काल नेतेपदी निवड म्हणजे, अधिकृतपणे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा. विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीसांची निवड झाली आणि थोड्याचवेळात राजभवनावर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. स्वत: एकनाथ शिंदेंनी फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्याची विनंती करत, शिवसेनेकडून पाठिंब्याचं पत्रही दिलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांकडून कालपासून जल्लोष केला जातोय. फडणवीसांची काल नेते पदी निवड होताच, ‘फडणवीसांनी एक है तो सेफ है’, ‘मोदी है तो मुमकिन है’चा नाराही दिला.
132 आमदारांसह भाजपनं आतापर्यंत महाराष्ट्रातली ऐतिहासिक कामगिरी केली. भाजपचे नेतृत्व करणाऱ्या फडणवीसांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळही पडली आहे. 2014 ते 2019 पर्यंत पूर्ण 5 वर्षे फडणवीस मुख्यमंत्री होते. पुन्हा येईन म्हणत 2019 मध्ये भाजपचे 105 आमदार फडणवीसांनी निवडूनही आणले. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले आणि फडणवीसांचं स्वप्न भंगलं. शिंदेंच्या बंडानंतर 2022मध्येही शिंदेच मुख्यमंत्री झाले. मात्र आता ऐतिहासिक विजयानंतर, फडणवीसच मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले आहेत.