ठाकरे सरकार पळपुटं, वीज कापणं बंद होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीवरूनही (Powar cut) फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.
मुंबई : राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी(Assembly Session) राजकारणातला माहोल तापला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आज विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या वीजतोडणीवरूनही (Powar cut) फडणवीस चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरुण शेतकऱ्यांना फेसबुक लाईव्ह करुन आत्महत्या केली. शेतकऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करतंय, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे वीज कनेक्शन कापलं होतं. तो एकटा सुरज नाही, तर कोट्यवधी शेतकऱ्यांची भावना या सुरजच्या माध्यमातून समोर आली आहे. संवेदनशील भावनेतून सरकारनं वीज कनेक्शन कापणं थांबवाव, ही आमची मागणी आहे, तसेच वीज जोडणी सुरु होत नाही, तो पर्यंत सभागृहासह सभागृहाबाहेरही आमचा लढा सुरुच राहिल, असा कडकडीत इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
ठाकरे सरकार शेतकरी विरोधी-फडणवीस
ठाकरे सरकार हे शेतकरीविरोधी आहे, शेतकरीविरोधी ठाकरे सरकारचा जाहीर निषेध आहे, असे म्हणत फडणवीसांनी हल्लाबोल चढवला आहे. हे सरकार कोडगं आहे, संवेदनहीन आहे. हे सरकार बेवड्यांकरता पॉलिसी करु शकतं, मात्र शेतकऱ्यांसाठी नाही. सातत्यानं नापिकी आहे, कधी अतिवृष्टी आहे, कधी कोरड आहे. त्यामुळे आमची वीज कापू नका अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. दोन वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंकी नाही कापणार वीज कनेक्शन, पाचशे सातशे भरले तरी वीज कनेक्शन कापणा नाही, असं म्हणाले होते, पण अजित पवारांच्या शब्दाला किंमतच नाही असं दिसतंय. वाटाण्याच्या अक्षता लावल्या त्यांच्या आश्वासनाला, असे म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांनाही टार्गेट केले आहे.
बिलं भरलेल्या शेतकऱ्यांचेही डिपी काढले
एकीकडे कनेक्शन कापले जात आहेत. तर दुसरीकडे सहा शेतकऱ्यांनी बिल भरलं असलं आणि दोन शेतकऱ्यांनी भरलं नसले तरी संपूर्ण डीपी काढून नेली जाते. सगळ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जातंय. हातातोंडाशी आलेली पिकं हिरावली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. हा असंतोष सभागृहात मांडला, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे. मविआचे आमदारही पोटतिडकीनं हेच सांगत होतं. पण सरकारनं काहीच प्रतिसाद न देता सभागृहातून पळ काढलाय. एक सूरज जाधव देवाघरी गेला. टोकाचं पाऊल उचलत. आमची शेतकऱ्यांना विनंती की तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहणार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.