Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती
धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 12 एप्रिल त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांना रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाला आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) त्यांना भरती करण्यात आलं होतं. 12 एप्रिल रोजी यांना दुपारी अचानक काही अस्वस्थता जाणवू लागली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हा सौम्य हृदयविकाराचा झटका असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तपासण्यांअंती हा हृदयविकाराचा झटका नसल्याचं समोर आलं. रुग्णालयात भरती झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची अनेक मंत्री (Ministers) आणि नेत्यांनी भेट घेतली होती. आज शनिवारी 16 एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून डिश्चार्ज देण्यात आला.
‘आपला आभारी, लवकरच जनसेवेला येतो’
चार दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे रुग्णालयाने आज त्यांना डिस्चार्ज दिला आहे. रुग्णालयातून बाहेर पडताना श्री मुंडे यांनी आता प्रकृती चांगली असून माझ्या प्रकृती साठी प्रार्थना करणारे सर्व कार्यकर्ते, हितचिंतक तसेच रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करणारे सर्व पक्षाचे नेते मंडळी व डॉक्टरांचे आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही दिवस विश्रांती घेऊन लवकरच मी पुन्हा पूर्वीसारखा बरा होऊन जनसेवेत दाखल होईन, असे ते म्हणाले.
‘भेटीसाठी कुणीही येऊ नये’
दरम्यान, डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे कार्यकर्त्यांनी काही दिवस भेटीसाठी येऊ नये मी स्वतः लवकरात लवकर स्वतः कार्यकर्त्यांना येऊन भेटेल असे आवाहनही त्यांनी केले. रुग्णालयात असताना धनंजय मुंडे यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली होती. त्यांची बहीण पंकजा मुंडे आणि प्रतीम मुंडे, यशश्री मुंडेंसह पंकजा यांच्या आईदेखील धनंजय मुंडे यांच्या भेटीसाठी रुग्णालयात आल्या होत्या. पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून धनंजय मुंडेंना डिश्चार्ज मिळाला आहे. तरीही काही काळ विश्रांती घेऊन मी लवकरच जनसेवेत दाखल होतो. कार्यकर्त्यांनी भेटीसाठी घरी येऊ नये, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.
इतर बातम्या-