वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘शेवटपर्यंत एक मागणी…’
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडवर मकोका गुन्हा दाखल झाल्याने कराडच्या समर्थकांनी आज परळी शहर बंद केलं आहे. कराड समर्थकांकडून परळी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही सुरु आहे. वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाला आहे. वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्याची बातमी आज दुपारी समोर आली. त्यानंतर लगेच पुढच्या दहा मिनिटात परळी शहर बंद करण्यात आलं. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी बंदची हाक दिली. या बंदला दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. परळी शहरात आज मकरसंक्रांत असताना सुद्धा सर्व दुकानं बंद करण्यात आली आहे. बाजारपेठात आता शुकशुकाट बघायला मिळतोय. वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाणे बाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात वाल्मिक कराडची वयोवृद्ध आईदेखील सहभागी झाली आहे. या आंदोलनात कराड समर्थक आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सुरेश धस यांच्या फोटोवर चपलीने मारताना दिसले. आंदोलक प्रचंड संतापले आहेत. दुसरीकडे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड याच्यावर मकोका गुन्हा लागल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
“आमची शेवटपर्यंत एक मागणी आहे. आमच्या मागणीत कधीही बदल होणार नाहीत. या कट कारस्थानात जे माणसं आहेत त्या प्रत्येकाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे”, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी मांडली. दरम्यान, कोर्टात आज वाल्मिक कराडच्या कोठडीवर सुनावणी पार पडली. यावेळी एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा मागितला. याबाबतचा निकाल अजून जाहीर व्हायचा आहे. धनंजय देशमुख यांना याबाबत प्रश्न विचारला असता, “त्यांच्याकडे पुरावे असतील. त्यामुळे त्यांनी दावा केलाय. मला CID वर विश्वास आहे. सीआयडीने पहिल्या सुनावणी दरम्यान जो युक्तिवाद केला होता त्यामध्ये खंडणी ते खून प्रकरणात कनेक्शन आहे, असं होतं. मग त्या संदर्भातले पुरावे त्यांच्याकडे असतील म्हणून त्यांनी ताबा देण्यासाठी विनंती केली असेल”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
‘आम्ही मागणीवर ठाम’
“यानंतर या घटना घडल्या नाही पाहिजेत. मुळासकट हे उखाडून काढायचं आहे. न्यायाच्या भूमिकेत आम्ही मागणीवर ठाम आहोत. ज्यावेळेस आम्ही एसआयटीचे प्रमुख तेली साहेबांना भेटू त्यावेळेस अधिकच स्पष्टीकरण होईल. त्यांच्याकडून आम्हाला जी माहिती मिळणार आहे. ती मिळाली नाही माहिती घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत. वाल्मिक कराडची संपत्ती ते तपासतील. तो त्यांचा तपासाचा भाग आहे. परवाच्या दिवशी आम्ही माहिती द्या म्हणून मागणी केली होती. काल आम्ही आंदोलन केलं. मात्र त्याच्या अगोदर आम्ही पोलीस प्रशासनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर, सगळ्यांवर विश्वास ठेवला”, असं धनंजय देशमुख म्हणाले.
परळीतील आंदोलनावर धनंजय देशमुख काय म्हणाले?
वाल्मिक कराड याच्या समर्थकांकडून सुरु असलेल्या आंदोलनाबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “आपण कसं बोलावं? माझ्या भाऊची हत्या केली. त्याला हिरावून घेतलं. आपण तेवढेच बोलणार”, अशी भावना धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली.
परळीत जमाबंदी असताना आंदोलन केलं जात आहे. याबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला. “तेच म्हणतो ना त्यांचा भाग आहे. पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली, धिक्कार असो काहीतरी घोषणा दिल्या. ते त्यांच्या बुद्धिमत्तेचा विषय आहे. त्याच्याविषयी मला बोलण्याची काहीच गरज नाही. मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे. मी डायव्हर्ट होणार नाही, आणि मी माझ्या न्यायाच्या भूमिकेत कायम असेल”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.