Manoj Jarnage Patil : ‘आत्महत्या करायची नाही, तुम्ही..’, धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवर, मनोज जरांगेंचा फोन
Manoj Jarnage Patil : मस्साजोगमध्ये ग्रामस्थ आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. पाण्याच्या उंच टाकीवर धनंजय देशमुख आहेत. त्यांना खालून मनोज जरांगे पाटील यांनी फोन लावला.
अखेर धनंजय देशमुख यांचा शोध लागला आहे. मस्साजोगमधील पाण्याच्या टाकीवर चढून ते आंदोलन करत आहेत. संतोश देशमुख यांना न्याय मिळत नसल्याने मस्साजोगमधील गावकऱ्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. धनंजय देशमुख यांचा आज सकाळपासून संपर्क होत नव्हता. ते कुठे गेलेत? हे कोणालाच ठाऊक नव्हतं. अखेर दुपारी पावणेबाराच्या सुमारास ते मस्साजोगमधील पाण्याच्या टाकीवर दिसले. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मस्साजोगमध्ये आले आहेत. त्यांनी स्वत: धनंजय देशमुख यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला व त्यांना खाली उतरण्याच आवाहन केलं.
“तुम्हाला काय झालं, तर मी यांचं जीण मुश्किल करेन. तुम्ही खाली या, तुमची कुटुंबाला गरज आहे. आपल्याला संतोष भय्याला न्याय द्यायचा आहे. माझा समाज तुमच्या पाठिशी आहे. आत्महत्या करायची नाही, खाली या” अशा शब्दात मनोज जरांगे धनंजय देशमुख यांची समजूत घालत होते. पण ते खाली आलेले नाहीत.
धनंजय देशमुख हे आंदोलन का करतायत?
“खंडणीमुळे माझ्या भावाचा खून झाला. खंडणीमधल्या गुन्हेगारांना पूर्ण आरोपी केलेलं नाही. त्या सगळ्यांना आरोपी करावं ही त्यांची मागणी आहे. पुरावे असताना त्यांना आरोपी करत नाहीयत. ही गोष्ट त्यांना माहितीय. पोलिसांना पुरावे सांगितलेत, कोणी कोणाला कसा फोन केला. बऱ्याच घटना पोलिसांना सांगितल्यात, पण तसा तपास होत नाहीय. त्यांना कुठेतरी वाचवायचा प्रयत्न होतोय. म्हणून धनंजय देशमुख हे आंदोलन करतायत” असं त्यांच्यासोबत पाण्याच्या टाकीवर असलेल्या एकाने सांगितलं. धनंजय देशमुख यांनी जेवण केलेलं नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खराब आहे.
‘कलेक्टरसाहेब तुम्ही तातडीने येऊन जा’
“मला असं वाटतय तुम्ही खाली या. एखाद्या लेकराचा जीव नको जायला. मी पाया पडलो त्यांच्या. कलेक्टरसाहेब तुम्ही तातडीने येऊन जा. जीव जाऊ नये कोणाचा. तेली साहेबांना बोलवा. पुण्याहून कोण निघालय, तुम्ही या तो पर्यंत. तो पर्यंत मी विनंती करतो” असं मनोज जरांगे पाटील फोनवरुन बोलताना म्हणाले.