तुम्ही केलं तर संस्कार अन् आम्ही केलं तर गद्दार?; धनंजय मुंडे यांचा बारामतीतूनच शरद पवारांवर हल्लाबोल
मधल्या काळात जे काही चाललं होतं. ते चाललं होतं विजय शिवतारे बापूंना सांगितलं. 11 तारखेला सभा झाली. या पुरंदरमधील ऐतिहासिक सभा झाली. पण ती सभा झाल्यावर अजितदादांना फोन केला. त्यांना सांगितलं. ती सभा म्हणजे विजयाची सभा आहे. बारामती लोकसभा संघाचा निकाल बदलणारी सभा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला केला. तुम्ही पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार अन् अजितदादांनी महायुती केली तर गद्दार? तुम्ही भाजपशी चर्चा केल्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते संस्कार आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतला तर गद्दार?, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. तर देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान कोण होणार? मोदी की इतर कोणी? याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथे राष्ट्रवादीचा युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात धनंजय मुंडे अनेक महत्त्वाचे गौप्यस्फोट केले. तसेच शरद पवार यांना घेरण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातून जो पूर्वीचा उस्मानाबाद आणि आताचा धाराशिव आहे. तोही दुष्काळी आहे. तिथून पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीत पवारांच्या घरी मराठवाड्याची लेक दिली. तिला बाहेरची म्हटली जाते. तिला विजयी करा हे सांगण्यासाठी आलो आहे. ही निवडणूक माझ्या मराठवाड्यातील मातीसाठी प्रतिष्ठेची आहे. मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची आहे. घरी सून आली तर तिला लेक मानतो, याचा विसर पडत चालला आहे. या निवडणुकीत देशाचं भवितव्य ठरवायचं आहे की एका कुटुंबाचं हे ठरवायचं आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
अन् बारामतीचा विकास झाला
अजितदादांचा विवाह 1985 साली झाला. सुनेत्राताई पवारांची सून म्हणून 1985 ला आल्या. त्या आधी 1978 मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. जबाबदारीने बोलतो. तुम्हीही इतिहास तपासा. 1985ला सुनेत्राताईंचे बारामतीला पाय लागले त्यानंतरच बारामतीचा विकास सुरू झाला हे विसरता कामा नये, असा दावा धनंजय मुंडे यांनी केला.
कुटुंब निवडायची वेळ का आली?
मी जबाबदारीने बोलतोय. देशातील प्रत्येक कॅमेऱ्यासमोर बोलतोय. प्रत्येकाला उत्तर देण्याची तयारी ठेवून बोलतो. ते म्हणतात, दादांनी गद्दारी केली. दादा गद्दार आहे. आमच्यासारख्यांनी काही बोललं तर लगेच यांची लायकी आहे का?साहेबांच्या विरोधात बोलावं? होय, साहेब आमचं दैवत आहेत. आजही जाणते राजा आहेत. जाणता राजाला घर नसतं. पोरं नसतात. बाळ नसतं. संबंध कुटुंब त्यांचं घर असतं. रयत त्याचं घर असतं. रयत आणि कुटुंबात निवड करताना कुटुंब निवडायची वेळ का आली? असा सवाल त्यांनी शरद पवार यांना केला.
दिल्लीत बैठक कुणाच्या घरी?
पुलोदचं सरकार स्थापन केलं तर संस्कार म्हणायचे आणि दादाने केलं तर गद्दारी म्हणायची. हे दादांनी एकट्याने केलं नाही. असंख्य जणांनी केलं. लोकशाहीचा निर्णय होता. 2014मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादाने केलं गद्दारी आहे. 2017मध्ये गणेशचतुर्थीला एक बैठक झाली. कुठे? कशी बैठक झाली? दिल्लीला कुणाच्या घरी बैठक झाली? शिवसेनेला कसं बाजूला काढायचं हे कसं ठरलं? त्या बैठकीचे व्हिडीओ देऊ शकतो. तुम्ही केलं ते संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार? असा सवाल त्यांनी केला.
तर भाजप गद्दार?
भाजपला बाहेरून पाठिंबा दिला. शिवसेनेला बाजूला केलं ते संस्कार. भाजपने शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना घेऊन मुख्यमंत्री केलं तर भाजप गद्दार? तुम्ही केलं तर संस्कार आणि आम्ही केलं तर गद्दार? कुणाचे काय संस्कार आणि कुणाची काय गद्दारी आहे मी जीवनात एकदा दाखवणार आहे. आमदारांच्या सह्यांचा कागद माझ्याकडेही आहे, असं ते म्हणाले.