मूल तुमची, मग करुणा आई कशी नाही? कोर्टाच्या सवालाने धनंजय मुंडे कोंडीत
वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी देण्याचा आदेश दिला होता. यावर मुंडे यांनी उच्च न्यायालयात स्थगितीची याचिका दाखल केली. कोर्टात मुंडे यांच्या वकिलांनी लग्नाचा अभाव आणि करुणा शर्मा यांची आर्थिक क्षमता या मुद्द्यांवर युक्तीवाद केला.

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी वरच्या कोर्टात धाव घेत पोटगीला स्थगिती देण्यासाठी याचिका दाखल केली. आज या याचिकेवर अंतिम सुनावणी पार पडत आहे. धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात केलेला युक्तीवाद आणि कोर्टाचे म्हणणं काय? याबद्दलची सविस्तर माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला २ लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज अंतिम सुनावणी सुरु आहे. करुणा मुंडे यांना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. तर पोटगीची रक्कम तुटपुंजी असून ती 9 लाख रुपये करण्यात यावी, अशी मागणी करुणा मुंडे यांनी केली आहे. आता याप्रकरणी धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडल्यानंतर कोर्ट काय म्हणाले, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचं म्हणणं कोर्टात मांडले. जर लग्न झालंच नाही तर मी पोटगी कशी देणार? असा सवाल धनंजय मुंडेंच्या बाजूने वकिलांनी विचारला, त्यावर कोर्टाने दुसऱ्या याचिकाकर्त्यांना (करुणा शर्मा) त्यांना मूल आहेत. मग ही मूलं कोणाची आहेत, अशी विचारणा केली. मग करुणा आई आहे की नाही. मग ह्यांचे वडील कोण? असे प्रश्न कोर्टाने धनंजय मुंडेंच्या वकिलांना केले.
मूल तुमची, मग करुणा आई कशी नाही?
त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी पुन्हा एकदा बाजू मांडली. राजश्री मुंडे या धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत. मी मुलांना स्वीकारत आहे. पण मी त्यांच्या आईशी लग्न केलं नाही, असा युक्तीवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केला. त्यावर कोर्टाने पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना सवाल केला. मूल तुमची आहेत असं म्हणता, मग करुणा आई कशी नाही? असा प्रश्न कोर्टाने त्यांना विचारला. त्यावर धनंजय मुंडेंच्या वकिलांनी धनंजय मुंडे यांचा करुणा मुंडेसोबत झालेले लग्न हे अधिकृत नाही. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही, असे कोर्टात म्हटले.
यावर न्यायधीशांनी धनंजय मुंडे यांचा वकिलांना पुन्हा प्रश्न विचारले. धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या दोन मुलाची आई आणि वडील कोण आहेत? असा सवाल धनंजय मुंडेंच्या वकिलांना केला. त्यावर वकिलांनी करुणा मुंडे यांचे इन्कम वर्षाला १५ लाखाच्या जवळपास आहे. त्या इन्कम टॅक्स भरतात. त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत, तरी त्यांनी पोटगीसाठी अर्ज केला. करुणा मुंडे यांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यांना माझ्या पैशांची गरज नाही. त्या स्वतः स्वतःचा खर्च मॅनेज करत आहेत. सातत्याने करुणा माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहे. करुणा मुंडे या आर्थिक दृष्ट्या सक्षम आहेत, असेही धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.