वाल्मिक कराडवर मकोका, धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
बीड सरपंच हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. कराडच्या पोलीस कोठडीबाबत उद्या कोर्टात युक्तिवाद होणार आहे. या प्रकरणी अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना कुणाचीही गय केली जाणार नाही असे म्हटले आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली असून, दोन्ही नेत्यांमध्ये या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. वाल्मिक कराडचे धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्याने या प्रकरणावरुन राजकीय वातावरणही तापलं आहे.
बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला आरोपी करण्यात आलं आहे. त्यामुळे वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीसाठी उद्या कोर्टात युक्तिवाद होणार आहे. यावेळी सीआयडी आणि एसआयटीची बाजू मांडणारे वकील वाल्मिक कराडला कोणत्या पुरावांच्या आधारे आरोपी केलं याची माहिती युक्तिवादादरम्यान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा रोल होता का? आणि होता तर नेमका काय रोल होता? ते आता लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच मुंबईतून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत.
मंत्री धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘देवगिरी’ निवासस्थानी दाखल झाले. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे अजित पवार आणि धनंजय मुंडे या दोन्ही नेत्यांमध्ये वाल्मिक कराड विषयी काही चर्चा होते का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आहे.
अजित पवार यांनी आज दुपारीच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणाचीदेखील गय केली जाणार नाही. ज्याचे धागेदोरे या तपासात समोर येतील त्याच्यावर कारवाई होणार, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी धनंजय मुंडे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर दाखल झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार हे दर मंगळवारी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांची आणि ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलवत असतात. अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडते. तशीच बैठक आज देखील आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी धनंजय मुंडे देवगिरी निवासस्थानी आल्याची माहिती आहे. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये बीडच्या प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. यानंतर आता काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.