धनंजय मुंडेसोबत रिलेशन ते घराचे रजिस्ट्रेशन…; करुणा शर्मांनी तारखेसह सर्वच सांगितलं
माझगाव सत्र न्यायालयाने करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध वैवाहिक असल्याचा निकाल दिला आहे. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. करुणा शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देताना २७ वर्षांच्या नातेसंबंधाची माहिती दिली.

करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असा निकाल माझगाव सत्र न्यायालयाने दिला आहे. यामुळे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनजंय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडे यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या याच आदेशाची सविस्तर प्रत समोर आली. त्यात करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील संबंध हे लग्नासारखेच आहेत, असं माझगाव सत्र न्यायालयाने म्हटल्याच समोर आले आहे. आता कोर्टाच्या आदेशावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
करुणा शर्मा यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडेंसोबत त्या कधीपासून आहेत, याबद्दलची सर्व सविस्तर माहिती दिली. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मी ते कोर्टात सादर करणार आहे. मी त्यांच्यासाठी काय त्याग केलाय, तेही कोर्टात सांगणार आहे, असेही करुणा शर्मा यावेळी म्हणाल्या.
करुणा शर्मा काय म्हणाल्या?
“हे लग्न १०० टक्के लग्नच होते. कारण अशीच कोणतीही व्यक्ती एखाद्यासोबत २७ वर्षे राहू शकत नाही. जे पुरावे मी कोर्टात दिलेले आहे. ते बघून न्यायाधीशांनी न्याय दिलेला आहे. त्यांचे तर हे म्हणणं आहे ही माझी बायको नाही. पण २७ वर्षे कोणीही व्यक्ती लग्नाशिवाय राहूच शकत नाही. इतका खोटारडा व्यक्ती मी आजपर्यंत पाहिलेला नाही. पूर्ण महाराष्ट्राच्या भारताच्या जनतेने असा माणूस पाहिलेला नसेल, असा आरोप करुणा शर्मांनी केला.
त्यांनी याचिकेत म्हटलंय की मी त्यांची बायको नाही. मी आमदार झाल्यानंतर मुंबईत येत जात होतो, असे त्यांनी म्हटले. येत जात होता कसलं काय, ते २०१० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आहेत आणि आमचे रिलेशन १९९६ पासून आहे. आमचे लग्न १९९८ साली झाले आहे. मी लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा मुंबईत घर खरेदी केले होते. त्याचे रजिस्ट्रेशन ३ जून २००३ केलेले आहे. त्याआधी मी म्हाडाच्या भाड्याच्या एका खोलीत राहायचे, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.
कोर्टानेही तेच सांगितले की तुम्ही इतके वर्षापासून का गप्प राहिलात, जर मी तुमचे नाव वापरत होते, जर तुम्हाला काही आक्षेप होता तर तुम्ही कशाला इतके दिवस शांत राहिलात. त्यांना असं वाटलं की मंत्री आहे काहीही होऊ शकतो, ही महिला आहे, गप्प बसेल. माझ्या नवऱ्याला माझ्या लढाऊ वृत्ती बद्दल माहिती होते. पण हे दलाल गँगच्या लोकांना असं वाटलं की मी २५ कोटी, ५० कोटी घेऊन शांत बसेन”, असेही करुणा शर्मांनी म्हटले.
स्वत:च मंगळसूत्र गहाण ठेवून…
मी कोणी नाचणारी, गाणारी बाई नाही किंवा ठेवलेली बाई देखील नाही. मी दोन मुलांना जन्म दिलाय. त्यांच्यावर इमानदारीने प्रेम केलंय. कोर्टाने सांगितलंय की मला माझ्या नवऱ्याप्रमाणे लाईफस्टाईल जगण्याचा हक्क आहे, त्यांना या सर्व गोष्टी पूर्ण कराव्या लागतील. २७ वर्षे स्वत:च मंगळसूत्र गहाण ठेवून, जितकं शक्य होईल तितकं सर्व करुन मी त्यांना साथ दिली आहे. आज मंत्री झाल्यावर त्यांच्या पैशावर नाचणारी, गाणारी महिला मजा करत आहेत. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत, मी ते कोर्टात सादर करणार आहे. मी त्यांच्यासाठी काय त्याग केलाय, तेही कोर्टात सांगणार आहे, असेही करुणा शर्मा म्हणाल्या.