बीडः गेल्या काही दिवसांपासून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून चिखलफेक करण्यात येत आहे. भाजपकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केलं जातंय. आता माजी गृहमंत्री अनिल परब यांच्या अटकेवरून पुन्हा एकदा राजकारण तापलं असून, आरोप करणाऱ्या भाजप नेत्यांवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी पलटवार केलाय.
परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ते पत्रकारांशी बोलत होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा धनंजय मुंडेंनी केलाय. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत. आणि चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, भाजपकडून राजकारण करण्यात येत असल्याच धनंजय मुंडे यांनी सांगितलंय. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. तर कोणत्याही चौकशीला अजितदादा सामोरे जाणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणालेत.
अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्दैवी आहे, अशी भावना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलीय. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय.
काल मध्यरात्री राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आज सकाळी आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 1000 कोटींची संपत्ती जप्त करण्याची नोटीस दिली. अजित पवार यांच्याशी संबंधित पाच संपत्ती जप्त करण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून आयटीच्या रडारवर आहेत. गेल्या महिन्यात आयकर विभागाने दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घर आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. यावेळी 184 कोटींची बेहिशोबी मालमत्त्ता सापडली होती. आयकर विभागाने 7 ऑक्टोबरपासून 70 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली होती. अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मालकीच्या अनंत मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवरही छापा मारला होता. तसेच पवारांच्या बहिणींच्या मालकीच्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
राष्ट्रवादीला लागोपाठ दुसरा झटका, अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती जप्त होणार; आयकर विभागाची नोटीस
फक्त अमृता फडणवीसच महिला आहेत काय? नवाब मलिक भाजप नेत्यांवर भडकले