काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार, माजी मंत्र्याचा पुत्र भाजपमध्ये दाखल होणार
Congress and BJP: दोन दिवसांपूर्वी मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी बसवराज पाटील उपस्थितीत होते. बसवराज पाटील यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सुरु झालेला भूकंप अजून थांबत नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गजांनी पक्ष सोडला. त्यानंतर अजूनही पक्षात उलटफेर सुरु आहे. आता धारशिव जिल्ह्यातून पक्षाला धक्का बसणार आहे. राज्याचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे माजी आमदार मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र पक्ष सोडत आहे. मधुकरराव चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचार सभेत हा प्रवेश सोहळा होणार आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत राहणार आहेत.
फडणवीस यांची घेतली होती भेट
दोन दिवसांपूर्वी मधुकरराव चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी बसवराज पाटील उपस्थितीत होते. बसवराज पाटील यांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या भेटीनंतर मधुकर चव्हाण यांचा पुत्रप्रवेश भाजपात निश्चित झाला. परंतु स्वत: मधुकर चव्हाण सध्या काँग्रेस पक्षात राहणार आहे. या घटनेमुळे धारशिव जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडर पडणार आहे.
का होत आहे भाजप प्रवेश
धारशिव जिल्ह्यात सहकारी संस्थांवर मधुकरराव चव्हाण आणि सुनिल चव्हाण यांचे वर्चस्व आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून या सहकार संस्थांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. या भागातील तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना, सूतगिरणी, पणनसंस्थांवर कर्ज झाले आहेत. यामुळे या संस्थांना वाचवण्यासाठी सुनिल चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची चर्चा आहे.
दोन नेत्यांना मिळाली खासदारकी
मराठवाड्यातील बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभेत खासदार करण्यात आले. भाजप प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना खासदार केले गेले. काँग्रेसमध्ये असलेले मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही शिवसेनेतून राज्यसभेत पाठवण्यात आले.