महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर, ‘त्या’ गोंधळातली इनसाईड स्टोरी, वाचा आतली बातमी
धुळ्यात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भर कार्यक्रमात अभूतपूर्व गोंधळ घातला. विशेष म्हणजे मंत्री अनिल पाटील यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. या गोंधळाबाबत आता संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे. या गोंधळाची इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे.
धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीत आज महायुतीमधील विसंवाद उघड झालाय. भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेल्या खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला वाळीत टाकलं जात आहे. त्यामुळे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगळी भूमिका घेऊ, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मेळाव्यात मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्यासमोरच हे नाराजीनाट्य घडलं. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रचारात सहभागी होण्यास विरोध दर्शवला. कार्यकर्त्यांना कार्यक्रमांमध्ये डावलले जात असल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला.
धुळे शहर आणि धुळे तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. स्थानिक आमदार लक्ष देत नाही. अक्कलपाडा योजना पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली नाही, धरण शंभर टक्के भरले गेले नाही. खासदार पत्र देऊन आमची कामे रद्द करतात. स्वतःच महत्त्व टिकवण्यासाठी आम्हाला डावलंल जातंय. आम्ही कोणत्या तोंडाने महायुतीच्या उमेदवारांसाठी मत मागायची. आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असं मत महायुतीचे समन्वयक म्हणून नेमणूक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी व्यक्त केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेत. मात्र महायुतीत आम्हाला वाळीत टाकल जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असे मत संतप्त कार्यकर्त्यांनी मांडले. मंत्री अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे शहराध्यक्षांची भामरेंवर टीका
धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर भामरे यांना भाजपने सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केल्यापासूनच त्यांच्या विरोधात विविध माध्यमातून नाराजी आणि विरोध उघड होत आहे. भाजपाच्या अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांनी देखील भामरेंच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली. आता पुन्हा एकदा महायुतीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुळे शहराध्यक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉक्टर भामरे यांच्या कार्यशैलीवर टीकेची झोड उठवत त्यांच्या प्रचारात सहभागी न होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही अलबेला नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. डॉक्टर भामरे यांना विविध प्रकारातून विरोधाचा सामना करावा लागत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नेमकी तक्रार काय?
- तालुक्यात पाण्याची टंचाई
- स्थानिक आमदार लक्ष देत नाही
- अक्कलपाडा सिंचन प्रश्न कायम
- धरण शंभर तक्के भरले गेले नाहीत
- खासदार पत्र देऊन आमची कामे रद्द करतात
- स्वतःची अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला दावललं जातंय
- आम्ही कोणत्या तोंडाने महायुतीच्या उमेदवारांसाठी मते मागायची
- आमचं अस्तित्व दाखवण्यासाठी आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल
- नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेच पाहिजेच
- मात्र महायुतीत आम्हाला वाळीत टाकल जात असेल तर वेगळी भूमिका घ्यावी लागेल