Dilip Walse Patil: तुमची सेक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत हे केंद्राला विचारणार; दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान
Dilip Walse Patil: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत (ins vikrant) घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत.
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्यावर आयएनएस विक्रांत (ins vikrant) घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. काल सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळण्यात आला. त्यामुळे सोमय्या हे पत्नीच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही दिसले नाहीत. त्यामुळे सोमय्या गेले कुठे? असा सवाल केला जात आहे. केंद्र सरकारने सुरक्षा दिलेली असतानाही सोमय्यांचा शोध का लागत नाही? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुमची सेक्युरीटी असलेले माणसं कुठे आहेत असं केंद्र सरकारला विचारू, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. कुणावरही आरोप करणं सोपं असतं. पण जेव्हा स्वत:वर आरोप झाले तर यंत्रणांसमोर उपस्थित राह्यचं नाही हे काही शूरपणाचे लक्षण नाही, असा टोलाही दिलीप वळसे पाटील यांनी लगावला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. 4 तारखेला इंटेलिजन्स विभागाने पोलिसांना पत्रं लिहून इशारा दिला होता. हे खरं आहे. तरीही चूक राहिली. पुरेसा बंदोबस्त ठेवला नाही. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित डीसीपीची बदली केली आहे. गावदेवीच्या निरीक्षकाला निलंबित केलं आहे. चौकशी सुरू आहे. आणखी चौकशीत जे पुढे येईल त्यानुसार कारवाई करू, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू
फोन टॅपिंग प्रकरणाचीही चौकशी सुरू आहे. त्यातून सर्व वस्तुस्थिती बाहेर आल्यावर बोलू. राज्य सराकरच्या पोलिसी विभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्नच येत नाही. या प्रकरणी पोलीस योग्य ती कारवाई करेल, असंही ते म्हणाले. तर, सुजात आंबेडकर नेमकं काय बोलले हे मला माहीत नाही. त्याबाबतची माहिती घेऊन बोलेल, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
सोमय्यांचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी स्पष्टीकरण देतानाच उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं आहे. केवळ संजय राऊत यांच्या एका विधानावरून तक्रार करण्यात आल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. त्याने एक कागदही दिलेला नाही, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या:
Raut on Somaiya: इथे धमकी द्यायची, थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे; राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप