महाविकास आघाडीत जागा वाटपावरुन मतभेद? कुठल्या जागांवर कुणाचा दावा?
लोकसभेच्या जागावाटपाआधीच महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी काही जागांवर दावे केले आहेत. जागावाटपावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झालीय. कुठल्या जागांवर कुणी दावे केले आहेत, याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई : लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. जागावाटपासाठी प्राथमिक चर्चाही पार पडलीय. पण कुठलाही निर्णय होण्याच्या आधीच काही जागांवरुन मतभेद समोर आले आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी लोकसभेच्या 19 जागांवर दावा सांगितलाय. मुंबईत लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत. त्यापैकी गेल्यावेळी शिवसेनेनं 3 तर भाजपनं 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीला मुंबईत एकही जागा मिळाली नव्हती. सध्या शिंदे गटात असलेले राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत. पण दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गट प्रकाश आंबेडकर यांना उतरवण्याच्या तयारीत आहे. प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला तर ठाकरे गटाकडे विशाखा राऊत यांच्याही नावाचा पर्याय आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात बाप विरुद्ध बेटा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्या शिंदे गटाचे गजानन किर्तीकर इथून खासदार आहेत. त्यांच्याविरुद्ध त्यांचाच मुलगा अमोल किर्तीकर यांना ठाकरे गट तिकीट देणार असल्याची चर्चा आहे. पण उत्तर पश्चिममधून लढण्यासाठी काँग्रेसचे संजय निरुपमही उत्सुक आहेत.
उत्तर मुंबईत कोण निवडणुकीच्या रणांगणात उतरणार
उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार आहेत. संजय निरुपम हे उत्तर पश्चिममधून लढण्यासाठी इच्छुक असले तरी उत्तर मुंबईच्या जागेवरही त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर उत्तर मध्यमधून भाजपच्या पूनम महाजनांविरुद्ध काँग्रेस पुन्हा प्रिया दत्त यांना उतरवण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईतून भाजपतर्फे गोपाळ शेट्टी लढणार की विनोद तावडेंना तिकीट मिळणार? अशीही चर्चा सुरु झालीय.
विदर्भातल्या जागांवरुनही मविआतच संघर्ष?
हे झालं मुंबईतल्या जागांचं. पण विदर्भातल्या जागांवरुनही मविआतच संघर्ष होण्याची चिन्हं आहेत. रामटेकच्या जागेवर काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनी दावा ठोकलाय. तर रामटेकची जागा ठाकरे गटाचीच असल्याचं संजय राऊतांनी सांगितलंय.
अकोल्याच्या जागेवरुन लढण्याची इच्छा राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी व्यक्त केलीय. तर ठाकरे गटानंही या जागेवर आपला दावा सांगितलाय. अद्याप जागावाटपाची फक्त प्राथमिक चर्चाच झालेली आहे. कुठल्या जागेवर कोण लढणार हे अद्याप ठरलेलं नाहीए. त्याआधीच मविआतल्या घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु झालीय.