उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्यात लग्नसमारंभात चर्चा…संजय राऊत यांनी दिले नेमके उत्तर
दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आता पुन्हा काही लोकांना युती व्हावी, असे वाटत आहे.

राज्यातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेगळे संकेत मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप यांच्यात निर्माण झालेली दरी कमी होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपसंदर्भात नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. त्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर पुन्हा युतीची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मार्मिक उत्तर दिले आहे.
काय म्हणाले संजय राऊत
भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्यात एका लग्न समारंभात कुजबुज झाली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना-भाजप युती झाली म्हणजे तो सुवर्णक्षण असेल, असे उत्तर चंद्रकांत पाटील दिले होते. त्यामुळे आता शिवसेना उबाठा आणि भाजप एकत्र येणार का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटील आमचे मित्र आहेत. युतीचे समर्थक आहेत. शिवसेना-भाजप युतीसंदर्भात विचार करणारी जी जुनी पिढी होती, त्यात चंद्रकांत पाटील आहेत. परंतु भाजपमध्ये नवीन बाहेरुन आलेले हवसे-नवसे लोकांना शिवसेना-भाजप युतीचे महत्व माहीत नाही. आम्ही एकत्र २५ वर्ष चांगले काम केले. नरेंद्र मोदी यांच्यासोबत चांगले काम झाले.
संजय राऊत यांनी युती तुटण्यास अमित शाह जबाबदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दिल्लीत अमित शाह यांचा उदय झाल्यानंतर शिवसेना-भाजपमधील दरी वाढली. आम्ही मविआत भाजपमधील काही लोकांच्या हट्टामुळे गेलो. त्या लोकांमुळे २५ वर्षांची युती तुटली. आमचा पक्ष फोडून मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही एकनाथ शिंदे यांना दिला. आम्ही तेव्हा हिच मागणी केली होती. परंतु अमित शाह यांनी ही ती मागणी नाकारली. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडायची होती. आता पुन्हा अनेक लोकांना भाजप-शिवसेना युती होऊ शकते, असे वाटत होते. आता येत्या काळात काही घडमोडी घडणार आहे. आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेना उबाठामधील अनेक लोकांना युती व्हावी, असे वाटते.




शिवसेना नेते संजय राऊत यांनी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीबद्दल अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले. ते म्हणाले, दहा हजार कोटींचा कुंभमेळा एक हजार कोटीत कसा आटोपला. कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणावर अव्यवस्था दिसत होती. मोदी, शाह यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे.