आधी राज ठाकरेंचं भाषण ऐकलं, नंतर उमेदवारीसाठी आपापसात भिडले, सभागृहातच तुंबळ हाणामारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बैठकीनंतर सभागृहातच मनसेच्या कार्यकर्त्यांच्या दोन गटात मोठा राडा झाला. ही राडाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर आता राज ठाकरे हाणामारी करणाऱ्या कार्यकर्त्यांबाबत काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुन्हा चांगली घडी बसावी यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभराचा दौरा करत आहेत. पण राज ठाकरे जिथे जात आहेत तिथे वादच होताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मराठवाड्याचा दौरा केला. त्यांच्या मराठवाडा दौऱ्यावेळी मराठा आंदोलकांनी विरोध केला. मराठा आंदोलक धाराशिवमध्ये तर थेट राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचले होते. तिथे त्यांनी मोठा राडा घातला होता. यानंतर राज ठाकरे बीडमध्ये बैठक ठरलेल्या हॉटेल परिसरात पोहोचले त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवत आंदोलन केलं. आंदोलकांनी राज ठाकरेंच्या गाडीसमोर सुपाऱ्या फेकल्या होत्या. त्यांच्या मराठवाडा दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा देखील आता चर्चेला कारण ठरत आहे. पण या चर्चा थोड्या वेगळ्या आहेत. कारण राज ठाकरे यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आता राडा होताना बघायला मिळतोय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांचा 26 ऑगस्टपर्यंत विदर्भ दौरा असणार आहे. राज ठाकरे यांचा आज चंद्रपुरात पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठकीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण त्यांच्या बैठकीनंतर ते पुढच्या दौऱ्यासाठी निघताच सभागृहातच मनसेच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना हाणामारी केली. ही हाणामारीची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
राज ठाकरे यांची चंद्रपुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. त्यांच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांच्या दोन गटात मोठा राडा झाला. या बैठकीत पक्षाचे पदाधिकारी सचिन भोयर यांच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली. पण त्यांच्या उमेदवारीला पक्षाचेच पदाधिकारी चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांनी विरोध केला. त्यामुळे भोयर समर्थक आणि चंद्रप्रकाश बोरकर यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद झाला. या वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं. या हाणामारीची घटना कॅमेऱ्यातही कैद झाली आहे.
या राड्यानंतर मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “राज ठाकरे यांनी ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली, राज ठाकरे निघाल्यानंतर पक्षाचं नाव खराब करण्यासाठी एका कार्यकर्त्याने प्रकाश बोरकर नावाच्या कार्यकर्त्याने धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला. त्याची पक्षाने आजच हकालपट्टी केली आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केलं आहे. अशाप्रकारे पक्षात वाद घालणाऱ्यावर स्ट्रिक्ट कारवाई होईल, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया राजू उंबरकर यांनी दिली.
चंद्रप्रकाश बोरकर यांचा बंडखोरीचा इशारा
मनसेचे जिल्हा सचिव चंद्रप्रकाश बोरकर यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “बोरकरने सर्वात जास्त शाखा उभ्या केल्या. पण राज ठाकरे यांनी आपल्याला विधानसभेचं तिकीट न देता जो 10 ते 12 दिवसांपूर्वी पक्षात आलेला चंद्रकांत भोयर जो चंद्रपूरचा रहिवासी आहे, त्याला उमेदवारी देवून राज ठाकरेंनी खूप मोठी चूक केली. त्याला आमचे पदाधिकारी कधीच माफ करणार नाहीत. राज ठाकरे यांनी राजौरा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बरखास्त करावी. अन्यथा आम्ही बंडखोरी करणार”, अशी प्रतिक्रिया चंद्रप्रकाश बोरकर यांनी दिली.
विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला : राज ठाकरे
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांसोबत आज औपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे. “विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला असेल”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल हे आत्ताच सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीत मविआला शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान मिळालं नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधातील मतदान मविआला झालं”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. “लोकसभेत एससी समाज, मुस्लिमांचं मतदान मविआला झालं. पण विधानसभा निवडणुकीत तसं होणार नाही. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवाराला राहील. मी स्वत: निवडणूक लढणार नाही. अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत अजून निर्णय नाही. विदर्भात लवकरच संघटनात्मक बदल करणार. नव्या चेहऱ्यांना संधी देणार”, अशी माहिती राज ठाकरेंनी अनौपचारिक चर्चांमध्ये पत्रकारांना दिली.