जळगावात डॉ. हेडगेवारांच्या नावाने नव्या गावाची निर्मिती, अडीच हजार लोकवस्तीच्या गावाला लवकरच ग्रामपंचायतही मिळणार
डॉ. हेडगेवार यांच्या नावानं अस्तित्वात आलेलं हे देशातील पहिलंच गाव असल्याचं सांगितलं जात आहे. जळगावच्या (Jalgoan) धरणगाव तालुक्यात एरंडोल रस्त्यावर हे गाव वसलेलं आहे.
जळगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार (Dr. Keshav Baliram Hedgewar) यांच्या नावाने जळगावात डॉ. हेडगेवार नगर हे गाव अस्तित्वात आलं आहे. 1989 मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या नावानं एक छोटसं नगर स्थापन झालं होतं. आज याच नगराचं रुपांतर स्वतंत्र गावात (Village) झालंय. त्यामुळे डॉ. हेडगेवार यांच्या नावानं अस्तित्वात आलेलं हे देशातील पहिलंच गाव असल्याचं सांगितलं जात आहे. जळगावच्या (Jalgoan) धरणगाव तालुक्यात एरंडोल रस्त्यावर हे गाव वसलेलं आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018 पासूनच खऱ्या अर्थाने या गावाच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नव्हता. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने दुसऱ्याच मंत्रिमंडळ बैठकीत डॉ. हेडगेवार यांच्या नावाने गावाच्या निर्मितीला हिरवा कंदील दाखवला. आता गॅझेटमध्येही या गावाची नोंद झाली आहे. तसंच या गावाला महसुली दर्जाही मिळालाय. लवकरच गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतही स्थापन होणार असल्याचं सांगण्यात आलंय. या गावात संघ विचारांचे लोक राहतात. गावाची लोकसंख्या अडीच हजाराच्या आसपास आहे. गावाला डॉ. हेडगेवार यांचं नाव मिळाल्यानंतर आता गावात मुलभूत सोयीसुविधा देण्यात याव्यात अशी अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.
डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य लढ्यात कारावासही भोगला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये झाला होता. नागपुरातील एका गरीब ब्राह्मण परिवारात जे जन्माला आले. ते सुरुवातीपासूनच क्रांतीकारी विचारांचे होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपूर्वीपासूनच डॉ. हेडगेवार स्वातंत्र्यलढ्याशी जोडले गेले होते. त्यांनी महात्मा गांधी यांच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी जंगल सत्याग्रह उभारला. 29 जुलै 1930 डॉ. हेडगेवार यांना 9 महिने कारावास झाला. ज्यावेळी ते जंगल सत्याग्रहात सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी सरसंघचालक पद सोडलं होतं. त्यांच्या मते आपल्या वैयक्तिक कारणांमुळे संघाची हानी होऊ नये. डॉ. हेडगेवार सातत्याने या सर्व बाबी विचारात घेत होते. स्वातंत्र्य आंदोलनावेळी डॉ. हेडगेवार यांनी 1921 मध्येही 6 महिने कारावास भोगला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांचा भव्य सन्मान करण्यात आला. या सत्कारावेळी अनेक बडे नेते आणि आंदोलक उपस्थित होते.