रात्रीच्या वेळी अवकाशात घिरट्या घालणारी ड्रोन सदृश्य वस्तू? नागरिकांमध्ये भीती अन्…
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात फिरणारे ते ड्रोन सदृश्य वस्तू चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे.
राज्यातील काही शहरात ड्रोन सदृश्य वस्तू दिसत आहे. बीडमध्ये ड्रोन अवकाशात दिसल्यानंतर मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेरगिरी करत असल्याचा आरोप करत आहेत. बीडमधील या प्रकरणानंतर अहमदनगर जिल्ह्यात रात्रीच्या वेळी ड्रोन सदृश्य वस्तू दिसून आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यासंदर्भात पाथर्डी तहसीलदारांनी जिल्हाधिकारींना पत्र लिहिले आहे. तसेच त्या ड्रोन सदृश्य वस्तूचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात नेमके काय घडले?
अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात रात्री काही गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू आकाशात घिरट्या घालत असल्याने आढळून आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये त्या ड्रोन सदृश्य वस्तूंची चित्रिकरण केले. तसेच ते सोशल मीडियावर व्हायरल केले. परंतु या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक नागरिक रात्री उशिरापर्यंत भयभीत होऊन रस्त्यावर आले होते.
तहसीलदारांचे जिल्हाधिकारींना पत्र
पाथर्डी तालुक्यातील या प्रकाराची माहिती देणारे पत्र पाथर्डीच्या तहसिलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला लिहिले आहे. तसेच या वस्तू विषयी माहिती देत त्यासंदर्भात पत्र व्यवहार केला आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन तहसीलदार उध्दव नाईक यांनी केले आहे.
पाथर्डी अन् बीडमध्ये भीती
पाथर्डी तालुक्यात फिरणारे ते ड्रोन सदृश्य वस्तू चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी दिली आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यात सर्वदूर ड्रोनच्या घिरट्या सुरू आहेत. त्यामुळे बीड जिल्हात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वडवणी परिसरात हे ड्रोनच्या घिरट्या सुरू असल्याने गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ड्रोनच्या दहशतीमुळे ग्रामस्थ 24 तास जागे आहेत.