अरेरे! विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे कित्येक डमी उमेदवार, राजकारणात काय सुरु?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत डमी उमेदवारांचे बार उडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य साधणाऱ्या अनेक डमी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे त्यांचे उमेदवारी अर्ज वैध देखील ठरले आहेत.
नाशिकच्या नांदगावात शिंदे गटाचे सुहास कांदे विरुद्ध ठाकरे गटाचे गणेश धात्रक विरुद्ध महायुतीचे बंडखोर अपक्ष समीर भुजबळ आहेत. पण सुहास कांदेंविरोधात एका दुसऱ्या सुहास बाबुराव कांदे नावाच्या इसमाने अपक्ष अर्ज भरलाय. ते सुहास बाबुराव कांदे हे मूळ धाराशीवचे आहेत. यानंतर लगेच ठाकरे गटाच्या गणेश धात्रकांविरोधात अजून एका गणेश धात्रक नावाच्या व्यक्तीचाही अर्ज आलाय. त्यामुळे नांदगावात आता दोन सुहास कांदे, दोन गणेश धात्रक उमेदवार असणार आहेत. कांदेंच्या आरोपांनुसार फक्त मतदारांध्ये संभ्रम पसरवण्यासाठी मंत्री छगन भुजबळांनी सदर व्यक्तीला उभं केलंय. समीर भुजबळ काल धाराशीवच्या सुहास कांदेंना घेवून उमेदवारी भरण्यासाठी पोहोचले. त्यावेळी सुहास कांदेंचे समर्थक कार्यालयाबाहेर जमले होते .डमी सुहास कांदेंनी अर्ज भरल्यानंतर समीर भुजबळ त्यांना घेवून बाहेर पडले, आणि त्यांना आपल्या गाडीत बसवून निघूनही गेले.
छगन भुजबळांनी लोकसभेप्रमाणेच विधानसभेला डमी उमेदवारांचा भगरे पॅटर्न सुरु झाल्याचं म्हटलंय. तो भगरे पॅटर्न म्हणजे लोकसभेला दिंडोरीत शरद पवार गटाचे भास्कर गुरुजींविरोधात भाजपच्या भारती पवार उभ्या होत्या. पण इथंच भास्कर बाबू भगरे नावाचे अपक्ष उभे राहिले. पवार गटाच्या भगरेंचं चिन्ह होतं तुतारी वाजवणारा माणूस, आणि दुसऱ्या भास्कर भगरेंना चिन्ह मिळालं तुतारी. शरद पवार गटाचे भगरे हे पेशानं शिक्षक असल्यामुळे त्यांना ”भगरे सर” म्हणून लोक ओळखतात. पण इयत्ता तिसरी शिकलेल्या दुसऱ्या भरगेंच्या विनंतीमुळे निवडणूक आयोगानं त्यांच्या नावापुढे ‘सर’ हे टोपणनाव देण्याचं मान्य केलं. भास्कर भगरे १ लाख १३ हजार मतांनी विजयी झाले खरे पण तुतारी चिन्हावर लढलेल्या दुसऱ्या भास्कर बाबू भगरेंनीही 1 लाख 3 हजार मतं पदरात पाडून घेतली.
आणखी कोणकोणत्या ठिकाणी डमी उमेदवार?
- आता नांदगावातलं चित्र असं आहे की, शिंदे गटाच्या सुभाष कांदेंविरोधात एक अपक्ष सुहास कांदे उभे आहेत. ठाकरे गटाच्या गणेश धात्रकांविरोधात दुसरे एक अपक्ष गणेश धात्रक उभे आहेत आणि भुजबळांना विरोध म्हणून शिंदे गटाच्या कांदेच्या पत्नी अंजुम कांदेंनी येवल्यात अपक्ष म्हणून अर्ज भरलाय.
- नाशिक पूर्वे विधानसभेत भाजपनं नामसाधर्म्याचा फायदा घेत डमी उमेदवाराला २० लाख रुपये देवून अर्ज भरायला सांगितल्याचा आरोप होतोय. इथे शरद पवार गटाकडून गणेश गीते विरुद्ध भाजपचे राहुल ढिकले लढत आहेत. गीतेंच्या आरोपांनुसार भाजपच्या ढिकले समर्थकांनी गणेश गीतेच्या व्यक्तीला फोन करुन अर्ज भरण्यासाठी ऑफर दिली. मात्र राहुल ढिकलेंनी त्या क्लिपशी आपला संबंध नसून बदनामी झाल्याच्या आरोपात तक्रार दिलीय.
- शिर्डीतल्या बंडखोरांच्या मनधरणीसाठी भाजपनं थेट मुंबईहून स्पेशल विमान पाठवलं. शिर्डीत भाजपच्या राधाकृष्ण विखेंविरोधात राजेंद्र पिपाडा आणि पत्नी ममता पिपाडांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. मात्र त्यांनी अर्ज मागे घ्यावेत यासाठी भाजपनं मुंबईहू स्पेशल चार्टड विमान शिर्डीत पाठवलं. दोन्ही बंडखोर खास विमानानं मुंबईला रवाना झाले आहेत. आता बंड थंड होतं का? याकडे लक्ष आहे.
- पुण्यातल्या वडगावशेरीतही अजित पवार गटानं शरद पवार गटाविरोधात डमी उमेदवार उभा केल्याचा आरोप होतोय. वडगावशेरीत अजित पवार गटाचे सुनिल टिंगरे विरुद्ध शरद पवार गटाचे बापू पठारे लढतायत. इथं नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यातील बापू पठारे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीनं अपक्ष अर्ज भरलाय. मात्र अर्जात कोणतेही तपशील नसताना शेवटच्या १५ मिनिटात अजित पवार गटाच्या सुनिल टिंगरेंनी डमी उमेदवाराचा अर्ज भरल्याचा आरोप शरद पवार गटाकडून होतोय.
- माढा विधानसभेत शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांविरोधातही तब्बल 4 अभिजीत पाटील नावाचे वेगवेगळे उमेदवार उभे राहिले आहेत. चारपैकी एक अभिजीत पाटीलनं बहुजन समाज पार्टीकडून तर इतर तिघांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलीय. दुसरीकडे अपक्ष लढणाऱ्या बबन शिंदेंचे पुत्र रणजीत शिंदेंविरोधातही २ इतर अपक्ष रणजीत शिंदेंनी अर्ज केलाय.
- बांद्रा पूर्वेत अजित पवार गटाचे उमेदवार जिशान सिद्धीकींच्या नावाशी साधर्म्य असलेला मोहम्मद झिशान सिद्दीकी नावाचा व्यक्ती अपक्ष उभा राहिलाय.
- करमाळा विधानसभेत महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार संजय शिंदेंविरोधात इतर 3 संजय शिंदे नावाच्या अपक्षांनी अर्ज केलेत. चारही अर्ज वैध ठरल्यामुळे मतदारांना ईव्हीएम मशीनवर चार उमेदवार हे संजय शिंदे नावाचे दिसणार आहेत. हे चारही अर्ज वैध ( मंजूर ) झालेले आहेत. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही अपक्ष संजय शिंदेंविरोधात ३ संजय शिंदे उमेदवार होते. त्यामुळे निवडून आल्यानंतर मूळ संजय शिंदेंनी आपलं नाव बदलून ते संजयमामा शिंदे असं करुन घेतलं. त्यामुळे आता ईव्हीएममशीनमध्ये एक नाव संजयमामा शिंदे तर इतर ३ उमेदवार संजय शिंदे म्हणून असतील.
- रत्नागिरीच्या दापोलीत मविआच्या संजय कदमांविरोधात दोन संजय कदम अपक्ष आहेत. महायुतीच्या योगेश कदमांच्या मतदारसंघातही दोन इतर योगेश कदम अपक्ष चिपळूणमध्ये महायुतीच्या शेखर निकमांसमोर एक शेखऱ निकम अपक्ष तर मविआच्या प्रशांत यादवांविरोधातही एक अपक्ष प्रशांत यादवनं अर्ज भरलाय.